वृत्तसंस्था, अहमदाबाद – प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत विजयाची हॅटट्रिक साजरी केलेल्या भारतीय संघाची ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, बुधवारी तुलनेने दुबळ्या नेदरलँड्सशी गाठ पडणार आहे. यावेळी तडाखेबंद सलामीवीर अभिषेक शर्मा कामगिरी उंचावेल, अशीच भारतीय संघाला आशा असेल. अहमदाबादच्या सव्वालाख आसनक्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात फिरकीचा दबदबा अपेक्षित आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताच्या ट्वेन्टी-२० संघाने गेल्या दीड वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली असून या यशात अभिषेक शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, त्याला पदार्पणाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत अद्याप चमक दाखवता आलेली नाही. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध तो खातेही उघडू शकला नाही. या दोन सामन्यांदरम्यान तो पोटदुखी आणि तापाने त्रस्त होता. त्यामुळे त्याला नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते. पाकिस्तानविरुद्ध पुनरागमन करताना तो लय मिळविण्यासाठी झगडताना दिसला. ऑफ-स्पिनर सलमान आघाने त्याला जखडून ठेवले. सलग तीन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर अभिषेकचा संयम सुटला आणि मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. आता ‘अव्वल आठ’ फेरीपूर्वी अभिषेकला सूर गवसेल अशी भारताला आशा आहे. इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार लयीत असून त्यांच्यावरच भारताची मदार असेल.
प्रथम गोलंदाजी?
अभिषेकला अद्याप फारसे यश मिळाले नसले, तरी याचा भारतीय संघाच्या कामगिरीवर परिणाम झालेला नाही. भारतीय संघाने अमेरिका (२९ धावांनी), नामिबिया (९३ धावांनी) आणि पाकिस्तान (६१ धावांनी) यांच्यावर सहज मात केली. विशेष म्हणजे, तीनही सामन्यांत भारताने प्रथम फलंदाजी करूनच विजय मिळवला. आता अखेरच्या साखळी सामन्यात नाणेफेक जिंकल्यास प्रथम गोलंदाजी करून मग धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा भारतीय संघ प्रयत्न करू शकेल.
फिरकीविरुद्ध कसोटी
भारतीय फलंदाज फिरकीविरुद्ध अडचणीत सापडताना दिसत आहेत. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरॅस्मस, तसेच पाकिस्तानचे सॅम अयुब, उस्मान तारिक यांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात यश मिळवले होते. नेदरलँड्स संघात आर्यन दत्त आणि रूलॉफ वॅन डर मर्व यांसारखे उपयुक्त फिरकी गोलंदाज आहेत. त्यातच नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीकडून फिरकीपटूंना पुरेशी मदत मिळते. त्यामुळे आता फिरकीविरुद्ध भारतीय फलंदाज कामगिरी सुधारतात का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.
सहा सामन्यांत चार शून्य
‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा आपले अग्रस्थान टिकवून असला, तरी गेल्या काही सामन्यांतील त्याची कामगिरी चिंताजनक ठरत आहे. अभिषेकला गेल्या सहापैकी चार सामन्यांत खातेही उघडता आलेले नाही. त्यातच तो आडव्या बॅटने फटके मारण्याच्या प्रयत्नात वारंवार बाद होत आहे. त्यामुळे अभिषेकला आक्रमक फलंदाजीच्या आपल्या शैलीत किंवा योजनेत थोडा बदल करण्याबाबत विचार करावा लागू शकेल.
बुमराला खेळणार?
भारतीय संघाचे ‘अव्वल आठ’ फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. त्यामुळे भारतीय संघ नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देऊ शकेल अशी चर्चा होती. मात्र, बुमरा या सामन्यात खेळणार असल्याचे संकेत फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत दिले. पाकिस्तानविरुद्ध अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज या दोघांनाही संघाबाहेर बसावे लागले होते. मात्र, आता या दोघांपैकी एकाला कुलदीप यादवच्या जागी संधी मिळू शकेल.

