IND vs NZ: व्यंकटेश अय्यर करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण?; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आज जयपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने भारताचे खेळाडू मैदानात उतरतील

India vs new Zealand 1st t2o playing 11 as rohit Sharma dravid era begins
(फोटो सौजन्य – AP)

आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ मधील कामगिरी मागे टाकून  भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आज जयपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने भारताचे खेळाडू मैदानात उतरतील. पूर्णवेळ टी२० आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच मालिका आहे, तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचाही पहिलाच सामना असणार आहे. भारतीय संघासाठी व्यंकटेश अय्यर या सामन्यातून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो, तर युझवेंद्र चहललाही संघात पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते.

याआधी चहल आणि अय्यर हे दोघेही टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात नव्हते. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या संघात कर्णधार केन विल्यमसन टी-२० मालिकेत खेळणार नाही आणि त्याच्या जागी टीम साऊदी कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण होता. भारतीय संघाला सुपर-१२ फेरीत पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. न्यूझीलंडच्या संघाने चमकदार कामगिरी करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तर त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विल्यमसन टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळणार नाही.

IND vs NZ: संघ फक्त एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करत नाही- रोहित शर्मा

टी २० विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजीची अपयशी ठरली होती, मात्र त्यानंतर तीन सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुलने चांगली खेळी केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोघांच्याही नजरा खिळल्या आहेत. इशान किशन आणि रोहित शर्मा प्रथम फलंदाजीसाठी उतरु शकतात, तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते. तर हार्दिक पंड्याच्या जागी व्यंकटेश अय्यरचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

रोहित-राहुल पर्वाला प्रारंभ; भारत-न्यूझीलंड यांच्यात आज जयपूर येथे पहिला ट्वेन्टी-२० सामना

टी २० विश्वचषकातून बाहेर पडलेला लॉकी फर्ग्युसन आता दुखापतीतून बरा झाला आहे आणि पहिल्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळू शकतो. मिचेल सँटनर आणि ईश सोधी हे टी २० विश्वचषकात डाव्या हाताच्या खेळाडूंविरुद्ध उत्तर खेळताना दिसले, त्यामुळे किशन आणि पंतसाठी न्यूझीलंडचा संघ काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. डॅरेल मिशेलने उपांत्य फेरीत शानदार खेळी केली त्यामुळे मालिकेतही त्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद सिराज, दीपक चहर, युझवेंद्र चहल.

न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

डॅरेल मिशेल, मार्टिन गप्टिल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, जिमी नीशम, मिचेल सँटनर, काइल जेमिसन, टिम साउथी (सी), ईश सोधी, ट्रेंट बोल्ट.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs new zealand 1st t2o playing 11 as rohit sharma dravid era begins abn

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या