कानपूर : मायदेशातील अनुकूलतेचा फायदा उठवत अक्षर पटेलने शनिवारी भारताच्या वर्चस्वाची पंचाक्षरे उमटवली. त्यामुळे १५१ धावांची दमदार सलामी नोंदवणाऱ्या न्यूझीलंडला पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी २९६ धावांवर रोखण्यात भारताला यश आले.डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षरने न्यूझीलंडच्या फलंदाजांची पहिल्या डावात दाणादाण उडवली. ३४-६-६२-५ असे अक्षरच्या गोलंदाजीचे प्रभावी पृथक्करण होते. रविचंद्रन अश्विनने त्याला अप्रतिम साथ देताना ८२ धावांत ३ बळी मिळवले आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीतील तिसऱ्या स्थानाच्या दिशेने कूच केली. अक्षर-अश्विनच्या फिरकीमुळे भारताला पहिल्या डावात ४९ धावांची अनपेक्षित आघाडी मिळवता आली. उत्तरार्धात कायले जेमिसनने शुभमन गिलचा (१) त्रिफळा उडवल्यामुळे भारताची दुसऱ्या डावात १ बाद १४ अशी अवस्था झाली.

गुजरातच्या अक्षरने वर्षांच्या पूर्वार्धात इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. कारकीर्दीतील चौथी कसोटी खेळणाऱ्या अक्षरच्या खात्यावर आता ३२ बळी जमा असून, न्यूझीलंडविरुद्ध पाचव्यांदा त्याने डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम दाखवला.

सकाळच्या सत्रात न्यूझीलंडच्या विल यंग (८९) आणि टॉम लॅथम (९५) या दोन्ही सलामीवीरांना शतकाने हुलकावणी दिली. अश्विनने यंगला बाद करीत न्यूझीलंडच्या १५१ धावसंख्येवर भारताला पहिले यश मिळवून दिले. मग उमेश यादवने संघनायक केन विल्यम्सनचा (१८) अडथळा दूर केला.  अक्षरच्या गोलंदाजीवर रॉस टेलरनेही (११) निराशा केली. अक्षरपुढे हेन्री निकोल्सलाही (२) मैदानावर फार काळ तग धरता आला नाही. मग अक्षरने धोकादायक लॅथमला यष्टीरक्षक भरतद्वारे यष्टिचित केले. त्यानंतर ठरावीक अंतराने न्यूझीलंडचे फलंदाज बाद होत गेले. जेमिसनने (२३) प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पहिल्या सत्रात २ बाद १९७ अशी मजल मारणाऱ्या न्यूझीलंडचे उर्वरित आठ फलंदाज पुढील दोन सत्रांत फक्त ९९ धावांत तंबूत परतले. दुसऱ्या सत्रात अक्षरने दर्जेदार फिरकीचा प्रत्यय घडवत किवी फलंदाजांची तारांबळ उडवली. अश्विनने विल्यम समरविलेचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडच्या डावावर पूर्णविराम दिला.

संक्षिप्त धावफलक

* भारत (पहिला डाव) : ३४५

* न्यूझीलंड (पहिला डाव) : १४२.३ षटकांत सर्व बाद २९६ (टॉम लॅथम ९५, विल यंग ८९; अक्षर पटेल ५/६२, रविचंद्रन अश्विन ३/८२)

* भारत (दुसरा डाव) : ५ षटकांत १ बाद १४ (चेतेश्वर पुजारा खेळत आहे ९; कायले जेमिसन १/८)

दुखापतीमुळे साहाऐवजी भरतकडे यष्टीरक्षण

कानपूर : अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा मानेच्या दुखण्यामुळे तिसऱ्या दिवशी मैदानावर उतरू शकला नाही. त्यामुळे के. एस. भरतने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली. वैद्यकीय चमू साहावर उपचार करीत आहे, असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे. ३७ वर्षीय साहा गेली काही वर्षे दुखापती आणि तंदुरुस्तीमुळे त्रस्त आहे. ऋषभ पंतला या मालिकेसाठी विश्रांती दिल्यामुळे साहाला संधी मिळाली. परंतु पहिल्या डावात त्याला फक्त एक धाव करता आली होती.

वानखेडेवर २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकर क्रिकेटरसिकांची निराशा झाली आहे. ३० हजार प्रेक्षकक्षमतेच्या वानखेडे स्टेडियमवर ५० टक्के प्रेक्षकांसाठी मुंबई क्रिकेट संघटना पाठपुरावा करणार असल्याचे पदाधिकाऱ्याने सांगितले. ‘‘महाराष्ट्र शासनाच्या ताज्या धोरणानुसार वानखेडे स्टेडियमवर २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी मिळाली आहे; परंतु आम्ही ५० टक्के प्रेक्षकांसाठी प्रयत्नशील आहोत,’’ असे ‘एमसीए’च्या सूत्रांनी सांगितले. वानखेडेवर अखेरचा कसोटी सामना २०१६ मध्ये भारत-इंग्लंड यांच्यात रंगला होता.

मी केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यशस्वी ठरू शकतो, असा काहींचा समज होता. मात्र, मी प्रथम श्रेणी क्रिकेट आणि भारत संघांसाठी कायमच चांगली कामगिरी केली. पांढरा चेंडू असो किंवा लाल चेंडू, यश मिळवण्यासाठी तुम्ही सकारात्मक मानसिकता राखणे गरजेचे असते. कसोटीत संधी मिळाल्यावर दमदार कामगिरीचा मला विश्वास होता.  अक्षर पटेल