कानपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावावर होता. टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ गड्यांच्या मोबदल्यात २५८ धावा केल्या आहेत. अंधुक प्रकाशामुळे खेळ ६ षटके आधी संपवावा लागला. श्रेयस अय्यरने (नाबाद ७५) टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करत पहिल्याच डावात सुरेख अर्धशतक झळकावले आणि रवींद्र जडेजाच्या साथीने नाबाद शतकी भागीदारी करून टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले. जडेजानेही (नाबाद ५०) आपले १७ वे अर्धशतक झळकावले. तसेच सलामीवीर शुभमन गिलनेही चांगली खेळी करत कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. न्यूझीलंडसाठी वेगवान गोलंदाज काइल जेमिसनने पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले आणि ३ बळी घेतले. टीम साऊदीला एक विकेट मिळाली.

न्यूझीलंडच्या संघात टॉम लॅथम, विल यंग, ​​केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, टिम साउथी, एजाझ पटेल, काइल जेमिसन, विल्यम सोमरविले यांचा समावेश आहे.

तर भारतीय संघात शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव यांचा समावेश आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ

सामन्याच्या तिसऱ्या षटकात शुभमन गिल बाद होण्यापासून बचावला. टीम साऊदीचा चेंडू त्याच्या पॅडवर आदळला आणि अपीलवर अंपायरने त्याला आऊट दिला. पण गिलने डीआरएस घेतला आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय भारताच्या बाजूने आला. त्यानंतर आठव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. मयंक अग्रवाल काईल जेमसनचा बळी ठरला. मयंकने २८ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १३ धावा केल्या.

शुभमन गिलने त्याचे चौथे कसोटी अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ८१ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने २७ षटकांनंतर एक विकेट गमावून ८० धावा केल्या. गिल ५० आणि चेतेश्वर पुजारा ५५ चेंडू खेळून १५ धावांवर खेळत आहे. दुसऱ्या विकेटसाठी गिलने चेतेश्वर पुजारासोबत ६० धावांची भागीदारी केली आहे. तत्पूर्वी, जेमिसनने मयंकला १३ धावांवर बाद करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले होते.

लंच ब्रेकपर्यंत ५२ धावांवर नाबाद राहिलेल्या शुभमन गिलने पहिल्याच षटकात आपली विकेट गमावली. काइल जेमिसनने दुसरी विकेट घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याआधी डावाच्या आठव्या षटकात जेमिसनने १३ धावांवर मयंक अग्रवालकडे यष्टिरक्षकाकडे झेलबाद केले. भारताने ८२ धावांवर दुसरी विकेट गमावली.

दुसऱ्या सत्रात शुभमन गिलची विकेट गमावल्यानंतर भारताने शंभरी पार करताच चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली. पुजाराने टीम साऊथीच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी २६ धावांचे योगदान दिले. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर पदार्पण करणारा श्रेयस अय्यर फलंदाजीला आला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अय्यर सध्या क्रीजवर आहेत.

अजिंक्य रहाणे बाद

५० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला अंपायरने आऊट दिली होते. मात्र, रहाणे रिव्ह्यू घेऊन बचावला, पण पुढच्याच चेंडूवर काईल जेमिसनने रहाणेला क्लीन बोल्ड केले. हा भारतासाठी मोठा धक्का आहे. रहाणेने ६३ चेंडूंत ६ चौकारांसह ३५ धावा केल्या. रहाणे बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात १४५ धावा होती. दरम्यान, रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर खेळत आहेत.

चहापानाच्या ब्रेकपर्यंत भारताची धावसंख्या ४ बाद १५४

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी कानपूरच्या ग्रीनपार्क येथे चहापानापर्यंत ४ बाद १५४ धावा केल्या. चहापानाच्या वेळेस कसोटी पदार्पण करणारा श्रेयस अय्यर १७ धावांवर तर रवींद्र जडेजा सहा धावांवर खेळत होता. न्यूझीलंडकडून काइल जेमिसनने तीन तर टीम साऊथीने एक विकेट घेतली.

श्रेयस अय्यरने झळकावले दमदार अर्धशतक

श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीतच अर्धशतक झळकावले आहे. अय्यरने ९५ चेंडूंत ६ चौकारांसह हे अर्धशतक केले आहे. भारताने आतापर्यंत ४ गड्यांच्या मोबदल्यात २०२ धावा केल्या आहेत. जडेजा आणि अय्यर यांनी आतापर्यंत ५ व्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली आहे.

रवींद्र जडेजाने ९९ चेंडूत पूर्ण केले अर्धशतक

रवींद्र जडेजाने ९९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याआधी शुभमन गिल आणि नवोदित श्रेयस अय्यर यांनीही अर्धशतक पूर्ण केली. अय्यर आणि जडेजा यांनी आतापर्यंत ५ व्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. ८३ षटकांनंतर भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात २५२ धावा झाली आहे.

पहिल्या दिवसअखरे भारताच्या ४ बाद २५८ धावा

कानपूर कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ४ बाद २५८ धावा झाल्या होत्या. पहिल्या दिवसखेर श्रेयस आणि जडेजा जोडीनं भारताचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. श्रेयस अय्यर (७५) आणि रवींद्र जडेजा (५०) धावा केल्या. त्यामुळे पहिल्या दिवसावर भारताची पकड असल्याचं दिसून आलं.