जयपूरमध्ये झालेल्या भारत न्यूझीलंड सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव (४० चेंडूंत ६२ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (३६ चेंडूंत ४८) या मुंबईकरांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात पाच गडी आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासहीत भारतीय क्रिकेटमध्ये रोहित आणि राहुल द्रविड या कर्णधार-प्रशिक्षक जोडीच्या नव्या पर्वाचाही विजयी प्रारंभ झाला. या सामन्यामध्ये न्यूझीलंडने मोठी धावसंख्या केल्यानंतर भारतानेही तितक्याच दमदार पद्धतीने उत्तर देत सामना जिंकला. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी उत्तम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. गप्टिलने ४२ चेंडूंत ७० धावा केल्या तर मार्क चॅपमनने ५० चेंडूंत ६३ धावांची खेळी केली. गप्टिलने आपल्या खेळीदरम्यान चार षटकार लगावले. पण त्यापैकी सर्वाधिक चर्चेत राहिला तो त्याचा नो लूक सिक्स.

नक्की पाहा हे फोटो >> राहुल द्रविडमधील ‘र’ अन् सचिन तेंडुलकरमधील ‘चिन’ = रचिन; जाणून घ्या न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रचं जवागल श्रीनाथ कनेक्शन

सामन्यातील १७ व्या षटकामध्ये गप्टिलने दिपक चहरला डीप मीड विकेटवरुन षटकार लगावला. मात्र गप्टिल षटकार लगावल्यानंतर सीमेपल्याड जाणाऱ्या चेंडूकडे पाहण्याऐवजी दिपक चहरकडे पाहत होता. चहरनेही त्याला अगदी खुन्नस देणारा लूक दिला. या दोघांचीही ही नजरा नजर कॅमेरात कैद झाली.

नक्की वाचा >> वॉर्नरप्रमाणे दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावण्याचा प्रयत्न त्याला पडला महागात; व्हिडीओ झालाय व्हायरल

हा षटकार मारल्यानंतर पुढच्याच चेंडूवर गप्टिल बाद झाला. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या दोन षटकांमध्ये चांगलं पुरनागमन केलं. गप्टिल हा १८ व्या षटकामध्ये संघाची धावसंख्या १५० होती तेव्हा बाद झाला. तळाच्या फलंदाजांनी उरलेल्या दोन षटकांमध्ये केवळ १५ धावा करता आल्या. मात्र असं असलं तरी चहर आणि गप्टिलमधील ही जुगलबंदी सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठत तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.