जयपूरच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दीमाखदार विजयासह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या पर्वाला झोकात प्रारंभ झाला. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत, जयपूरमधील पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतलेल्या भारतीय क्रिकेट संघ भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग याच्या घरच्या मैदानावर दुसरा टी-२० सामना खेळणार आहे. शुक्रवारी दुसऱ्या सामन्यात विजयासह न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विजयी आघाडीचे लक्ष्य भारतापुढे आहे. भारताने बुधवारी पहिला सामना पाच गडी राखून जिंकला.

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अत्यंत आक्रमक सुरुवात करत पहिल्या पाच षटकांत संघाची धावसंख्या ५० पर्यंत नेली. विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने संधीचा चांगला फायदा घेत ६२ धावांची खेळी केली.

पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत न्यूझीलंडच्या संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. जयपूरच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना चांगला स्विंग मिळाला. भुवनेश्वर कुमारने डॅरिल मिशेलला पहिल्याच षटकात इनस्विंग बॉलवर ज्या पद्धतीने बोल्ड केले ते पाहण्यासारखे होते. सुरुवातीच्या षटकांमध्ये मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि भुवनेश्वर यांनी त्यांच्या तंग लाईन लेन्थच्या मदतीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोकळेपणाने धावा करण्याची संधी दिली नाही. अशा प्रकारे भारतीय संघाने दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली.

दरम्यान, आज कर्णधार रोहित शर्मा अक्षर पटेलच्या जागी युझवेंद्र चहलला संधी देऊ शकतो. कारण अक्षरने मागील सामन्यात एकही विकेट घेतली नाही. अक्षरने पहिल्या टी २० सामन्यात चार षटकात ३१ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. आयपीएलमधील त्याच्या दमदार कामगिरीमुळे टी-२० विश्वचषक सुरू होण्यापासून चहलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत आता या सामन्यात रोहित चहलला संधी देतो की त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दुसऱ्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद सिराज