भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी : बळीदशक एजाझचे वर्चस्व भारताचे ! न्यूझीलंडच्या फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम

भारताच्या पहिल्या डावात मयांकच्या दीडशतकी खेळीसह फक्त अक्षरचे अर्धशतक आणि गिलच्या ४४ धावांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

३३२ धावांच्या आघाडीसह यजमानांची विजयाकडे वाटचाल

प्रशांत केणी, लोकसत्ता

मुंबई : जन्माने मुंबईकर असलेला न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज एजाझ पटेलने वानखेडे स्टेडियमवर शनिवारी ऐतिहासिक बळीदशक साकारले. परंतु न्यूझीलंडचे १० बळी फक्त ६२ धावांत गुंडाळत भारतीय गोलंदाजांनी हा पराक्रम झाकोळून टाकला. त्यामुळे ३३२ धावांच्या आघाडीसह भारताने दुसऱ्या कसोटीतील विजयाकडे वाटचाल केली आहे.

भारताने ४ बाद २२१ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केल्यानंतर शनिवारी सकाळच्या सत्रात एजाझच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. फक्त १०४ धावांत भारताचे उर्वरित सहा फलंदाज तंबूत परतल्यामुळे भारताला पहिल्या डावात ३२५ धावा उभारता आल्या. त्यानंतर भारताने रविचंद्रन अश्विन (४/८) आणि मोहम्मद सिराज (३/१९) यांच्या बळावर न्यूझीलंडचा पहिला डाव गुंडाळत वर्चस्वपूर्ण आघाडी घेतली. मग आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर फलंदाजीचा सराव व्हावा, या हेतूने फॉलोऑन टाळत भारताने पुन्हा फलंदाजी करीत दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ६९ अशी मजल मारली. दुखापतग्रस्त शुभमन गिलच्या जागी सलामीला उतरणारा चेतेश्वर पुजारा २९ धावांवर आणि मयांक अगरवाल ३८ धावांवर खेळत आहे.

भारताच्या पहिल्या डावात मयांकच्या दीडशतकी खेळीसह फक्त अक्षरचे अर्धशतक आणि गिलच्या ४४ धावांचे योगदान महत्त्वाचे ठरले. बाकीच्या फलंदाजांचा एजाझपुढे टिकाव लागला नाही. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव भोपळासुद्धा फोडू शकले नाहीत. मयांक आणि अक्षर यांनी सातव्या गडय़ासाठी ६७ धावांची बहुमोल भागीदारी उभारली. या दोघांना सर्वप्रथम एजाझने तंबूची वाट दाखवली. मग भारताचा डाव फार लांबला नाही. सिराजला रचिन रवींद्रद्वारे झेलबाद करीत एजाझने १०व्या बळीवर शिक्कामोर्तब केले.

कर्णधार केन विल्यम्सनशिवाय खेळणाऱ्या कसोटी विश्वविजेत्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नंतर हाराकिरी पत्करली. उत्तरार्धात संघातील स्थान वाचवण्याच्या इराद्याने पुजाराने तीन चौकार व एक षटकार खेचत आक्रमकता दाखवली. त्यामुळे भारत न्यूझीलंडला किती धावसंख्ये आव्हान देणार, हे औत्सुक्याचे ठरेल.

संक्षिप्त धावफलक

* भारत (पहिला डाव) : ३२५ (मयांक अगरवाल १५०, अक्षर पटेल ५२; १०/११९)

* न्यूझीलंड (पहिला डाव) : २८.१ षटकांत सर्व बाद ६२ (कायले जेमिसन १७; रविचंद्रन अश्विन ४/८, मोहम्मद सिराज ३/१९)

* भारत (दुसरा डाव) : २१ षटकांत बिनबाद ६९ (मयांक अगरवाल खेळत आहे ३८, चेतेश्वर पुजारा खेळत आहे २९)

तिसरा दशकवीर!

कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या देदीप्यमान इतिहासात एजाझ हा तिसरा दशकवीर गोलंदाज ठरला. एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम याआधी जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांनी दुसऱ्या डावात घरच्या मैदानांवर दाखवला होता. ४७.५-१२-११९-१० असे एजाझच्या गोलंदाजीचे प्रभावी पृथक्करण होते. २६ जुलै १९५६ या दिवशी इंग्लंडच्या लेकरने (५१.२-२३-५३-१०) ओल्ड ट्रॅफर्डवर ऑस्टेलियाविरुद्ध प्रथमच १० बळी घेतले. मग ४ फेब्रुवारी १९९९ या दिवशी कुंबळेने (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी प्राप्त केले. न्यूझीलंडकडून आतापर्यंत रिचर्ड हेडलीने सर्वाधिक ९ बळी घेतले होते. हा विक्रमसुद्धा त्याने कारकीर्दीतील ११व्या कसोटीत मोडीत काढला. एजाझच्या पराक्रमाला भारतीय संघानेही उभे राहून अभिवादन केले, पंचांनी हा चेंडू त्याला सुपूर्द केला.

विक्रम मुंबईतच, हे जणू विधिलिखित!

एजाझचा जन्म मुंबईतील जोगेश्वरीमधील. त्याच्या कुटुंबीयांनी व्यावसायानिमित्त न्यूझीलंडला स्थलांतर केले, तेव्हा तो जेमतेम आठ वर्षांचा होता. वयाच्या ३३व्या आपल्या जन्मस्थळी हा विश्वविक्रम व्हावा, हे जणू विधिलिखितच होते, अशी भावना एजाझने व्यक्त केली.

‘‘भारताविरुद्धच्या सामन्यातील १० बळींमुळे माझी क्रिकेट कारकीर्द खास झाली आहे. हा विक्रम मुंबईतच व्हावा, यासाठी ग्रहमान अनुकूल होते. हा माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी आनंदाचा योग आहे. करोनाच्या साथीमुळे माझे कुटुंब या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊ शकले नाही, याची खंत वाटते आहे,’’ अशी प्रतिक्रिया एजाझने व्यक्त केली.

१९९६पर्यंत एजाझचे कुटुंब मुंबईत वास्तव्यास होते. त्याची आई ओशिवऱ्याच्या शाळेत शिक्षिका होती, तर वडिलांचा व्यावसाय होता. आता त्याचे काही नातलग मुंबईत राहतात. पाच फूट, सहा इंचाचा एजाझ क्रिकेटच्या सुरुवातीच्या टप्प्यात वेगवान गोलंदाजी करायचा. परंतु न्यूझीलंडचे माजी फिरकी गोलंदाज दीपक पटेल यांच्यामुळे वयाच्या २०व्या वर्षी त्याने फिरकी गोलंदाजीचा वसा घेतला.

‘‘मुंबईतून जाण्यापूर्वी काहीतरी खास करावे, असे मनापासून वाटत होते. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मैदान सोडताना आपले नाव येथील यशवंतांच्या फलकावर असावे, असे विचार मनात आले. परंतु १० बळींचा विक्रम साकारला जाईल, हे अनपेक्षित आणि खास म्हणता येईल. हा माझ्या क्रिकेट कारकीर्दीमधील सर्वोच्च दिवस आहे,’’ असे एजाझने सांगितले.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आठवडाभर लांबणीवर

’  कोलकाता : ‘ओमायक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तनाच्या साथीमुळे भारताचा दक्षिण आफ्रिका क्रिकेट दौरा एक आठवडा उशिराने सुरू होणार असून, यातील ट्वेन्टी-२० मालिकेला तूर्तास कात्री लावण्यात आली आहे, अशी घोषणा भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही क्रिकेट मंडळांनी शनिवारी केली. सामन्यांच्या नव्या तारखा आणि मैदाने यांची घोषणा पुढील ४८ तासांत करण्यात येईल. परंतु चार ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका नंतर खेळवण्यात येईल. भारतीय संघ ९ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार होता. त्यामुळे आता कसोटी मालिका १७ डिसेंबरऐवजी २६ डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

कुंबळे यांचा १० बळींचा विक्रम मला नेहमी प्रेरणा द्यायचा. कारण त्यांच्या त्या पराक्रमाची चित्रफीत मी अनेकदा पाहिली आहे. त्यांच्या संदेशाने मी भारावलो.

– एजाझ पटेल

१० बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या पंगतीमध्ये तुझे स्वागत!

अप्रतिम गोलंदाजी! कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या विशेष मेहनतीचे चीज झाले. आता तुझ्याकडून अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.

-अनिल कुंबळे,  माजी फिरकी गोलंदाज

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs new zealand 2nd test ajaz patel takes all 10 wickets in test against india zws

ताज्या बातम्या