भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी : मयांकचा शतकी वर्षांव!

पुजारा, कोहलीकडून निराशा; भारताची ४ बाद २२१ धावांपर्यंत मजल

पुजारा, कोहलीकडून निराशा; भारताची ४ बाद २२१ धावांपर्यंत मजल

प्रशांत केणी, लोकसत्ता

मुंबई : पावसाची चिंता मिटली, दुखापतींनी संघरचनेचा गुंता सुटला आणि उपाहारानंतर सुरू झालेल्या पहिल्या दिवसाच्या खेळावर सलामीवीर मयांक अगरवालच्या शतकी वर्षांवाने छाप पाडली. एजाझ पटेलच्या फिरकीपुढे ३ बाद ८० अशी पडझड झाली असताना मयांकने धडाकेबाज नाबाद शतकी खेळी साकारल्यामुळे शुक्रवारी भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ४ बाद २२१ अशी मजल मारली.

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शुक्रवारी दोन सत्रांचा खेळ झाला. मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे अजिंक्य रहाणेला माघार घ्यावी लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीसाठी कोणत्या फलंदाजाला वगळावे, हा प्रश्न आपसुकच सुटला. कोहलीसाठी वगळावे लागणाऱ्या पर्यायांमध्ये मयांकचाही समावेश होता. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल हे दोघे विश्रांतीवर असल्यामुळे मयांकला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत संधी मिळाली. कानपूरला अनुक्रमे १३ आणि १७ धावा काढल्यामुळे मयांकसाठी सलामीचे स्थान टिकवणे कठीण झाले होते. परंतु मयांकने समोरच्या बाजूने होत असलेल्या हाराकिरीतही नेटाने किल्ला लढवत आपली दावेदारी मजबूत केली. पहिल्या दिवसअखेर २४६ चेंडूंत १४ चौकार आणि चार षटकारांसह १२० धावांवर मयांक खेळत आहे, त्याच्या साथीला वृद्धिमान साहा २५ धावांवर खेळत आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर मयांक आणि शुभमन गिल (४४) यांनी ८० धावांची सलामी नोंदवली. परंतु डावातील २८व्या आणि ३०व्या षटकात एजाझने बिनबाद ८० ते ३ बाद ८० असे सामन्याचे चित्र पालटले. फक्त १० चेंडूंत एजाझने गिल, पुजारा आणि कोहली या भारताच्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करीत न्यूझीलंडला सामन्यावर नियंत्रण मिळवून दिले. परंतु मयांकने श्रेयस अय्यरच्या (१८) साथीने चौथ्या गडय़ासाठी ८० धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. यात मयांकचे योगदान ५३ धावांचे होते. श्रेयसला एजाझने तंबूची वाट दाखवल्यानंतर मग मयांकने साहाच्या साथीने जोडी जमवत पाचव्या गडय़ासाठी ६१ धावांची अविरत भागीदारी केली.

जन्माने मुंबईकर एजाझने न्यूझीलंडच्या ७० षटकांपैकी २९ षटके टाकली. यातील १० निर्धाव ठरली. तर ७३ धावांत ४ बळी त्याला मिळवला आले. विल्यम समरवील आणि रचिन रवींद्र यांची त्याला पुरेशी साथ मिळू शकली नाही.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ७० षटकांत ४ बाद २२१ (मयांक अगरवाल खेळत आहे १२०, शुभमन गिल ४४, एजाझ पटेल ४/७३)

गावस्कर, द्रविड यांना मयांककडून श्रेय

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा सल्ला यांच्या सल्ल्यांना मयांकने नाबाद शतकी खेळीचे श्रेय दिले. गावस्कर यांच्या चित्रफिती पाहून मयांकने खेळतानाची खांद्याची स्थिती बदलली. ‘‘इंग्लंड दौऱ्यावर खेळू न शकल्याने मी दुखावलो. परंतु हे सत्य स्वीकारून माझ्या खेळावर आणि प्रक्रियेवर अधिक मेहनत घेण्यास सुरुवात केली. समालोचन करणाऱ्या गावस्कर यांनी माझ्याशी संवाद साधत मला मार्गदर्शन केले. खेळातील हाच बदल माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला,’’ असे मयांकने सांगितले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मयांक म्हणाला, ‘‘जेव्हा माझी दुसऱ्या कसोटीसाठी निवड झाली, तेव्हा राहुल सरांनी माझ्याशी चर्चा करून पाठबळ दिले. मैदानावर जा आणि तुझी सर्वोत्तम कामगिरी कर, हे त्यांचे शब्द प्रेरणादायी ठरले.’’

कोहली बाद आणि पंचगिरीवरून वाद

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीला वादग्रस्तरीत्या पायचीत हा कौल देण्यात आल्याने समाजमाध्यमांवर काही माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी पंचांवर निशाणा साधला. या कसोटीसाठी नितीन मेनन यांच्यासह अनिल चौधरी यांची मैदानावरील पंच म्हणून नेमणूक करण्यात आली. तर वीरेंदर शर्मा हे तिसरे पंच म्हणून कार्यरत आहेत. ३०व्या षटकात चौधरी यांनी कोहलीला पायचीत बाद घोषित केले. परंतु कोहलीने एका सेकंदातच रिव्ह्यू मागितला. रिप्लेमध्ये बॅट किंवा पॅडपैकी नेमका कुठे चेंडू पहिला लागला, हे सहज स्पष्ट होऊ शकले नाही. अशा स्थितीत मैदानावरील पंचांनी कोहलीला बाद ठरवल्याने शर्मा यांनीसुद्धा तोच निर्णय कायम राखला. त्यामुळे कोहलीही निराश झाला. यापूर्वी, पहिल्या कसोटीत मेनन आणि शर्मा यांनी एकूण पाच वेळा फलंदाजांना चुकीचे बाद दिले. त्यापैकी तीन वेळा डीआरएसने फलंदाजांना वाचवले.

मुंबईच्या कसोटी सामन्यामध्ये प्रथमच दोन महिला गुणलेखक

मुंबई : भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या प्रत्येक चेंडूचा वेगवान आढावा घेण्यासाठी दोन महिला गुणलेखकांची नेमणूक करण्यात आली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दोन महिला एकाच लढतीत गुणलेखकाची भूमिका बजावत आहेत. क्षमा साने आणि सुषमा सावंत या त्या दोन गुणलेखिका आहेत.  नाहूर येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय क्षमा २०१० मध्ये गुणलेखकाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी आयपीएल, रणजी करंडक यांसारख्या स्पर्धेत गुणलेखकाचे कार्य हाताळले असून मुंबई क्रिकेट संघटनेमधील (एमसीए) अनुभवी गुणलेखक म्हणून त्यांना ओळखले जाते. चेंबूर येथे राहणाऱ्या ५० वर्षीय सुषमासुद्धा २०१० मध्येच गुणलेखकाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. २०१३ मध्ये झालेल्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकापासून त्यांनी गुणलेखनाला सुरुवात केली. सुषमा यांना आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धामध्ये गुणलेखन करण्याचा अनुभव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs new zealand 2nd test day 1 centurion mayank agarwal leads india zws

Next Story
‘‘त्यानं माझ्या चेहऱ्यावर लघवी…”, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैनानं केले ‘धक्कादायक’ खुलासे!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी