भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी : विजय नक्की.. ही तर निवड चाचणी!

सोमवारी पहिल्या सत्रातच भारत न्यूझीलंडविरुद्ध कसोटीसह मालिकेत विजय प्राप्त करू शकेल.

भारताच्या ५४० धावांच्या लक्ष्यापुढे न्यूझीलंडचा निम्मा संघ १४० धावांत गारद

प्रशांत केणी, लोकसत्ता

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर सोमवारी दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत विजय मिळवणार ही आता काळ्या दगडावरील रेष आहे, याबाबत कुणाचेही दुमत होणार नाही; परंतु न्यूझीलंडला दुसऱ्या दिवशी फॉलोऑन न देत अडीच दिवसांत संपवता येणारी कसोटी लांबवल्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड चाचणी उरकता आली आहे.

आठवडाभर लांबणीवर पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची संघनिवडसुद्धा प्रलंबित ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या निवड चाचणी अभियानात स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या फलंदाजांचा आणि गोलंदाजांचा कस लागला. भारताने ७ बाद २७६ धावसंख्येवर दुसरा डाव घोषित करून न्यूझीलंडसमोर विजयासाठी सव्वादोन दिवसांत ५४० धावांचे लक्ष्य दिले. या डोंगरापुढे दडपणाखाली वावरणाऱ्या न्यूझीलंडचा निम्मा संघ १४० धावांत गारद झाला आहे. त्यामुळे उर्वरित पाच फलंदाजांना ४०० धावा करणे अवघड आहे. सोमवारी पहिल्या सत्रातच भारत न्यूझीलंडविरुद्ध कसोटीसह मालिकेत विजय प्राप्त करू शकेल.

भारताने डाव घोषित करण्यास विलंब केला, याबाबत समर्थन करताना अक्षर पटेल म्हणाला, ‘‘सामना संपण्यासाठी बराच वेळ बाकी असल्याने विलंब झाला, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. पुरेशी फलंदाजी करता यावी, हे यामागील प्रमुख धोरण होते. अशा प्रकारच्या वातावरणात धावसंख्येचा पाठलाग करण्याची स्थिती आल्यास कशी करता येईल, याची आम्ही चाचपणी केली.’’

फॉलोऑन टाळून घेतलेल्या चाचणीत मयांक अगरवाल (६२), शुभमन गिल (४७), चेतेश्वर पुजारा (४७), अक्षर पटेल (२६ चेंडूंत ३ चौकार, ४ षटकारांसह नाबाद ४१) यांनी निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्माची विश्रांती आणि के. एल. राहुलची दुखापत यामुळे मयांक आणि शुभमनला सलामीची संधी मिळाली. यात मयांकने पहिल्या डावातील दीडशतकी खेळीपाठोपाठ दुसऱ्या डावातही अर्धशतक पेश केले. बोटाच्या दुखापतीला मागे टाकत उतरणाऱ्या शुभमनने पहिल्या डावातप्रमाणेच दुसऱ्या डावातही सातत्य दाखवले, परंतु दुर्दैवाने दोन्ही डावांत त्याचे अर्धशतक हुकले. कानपूर कसोटीमधील अपयशामुळे दुखापतीचे कारण देत अजिंक्य रहाणेला संघातून वगळल्यानंतर पुजारावरील दडपण वाढले होते. दडपणाखाली पहिल्या डावात भोपळा फोडणाऱ्या पुजाराने गेल्या तीन डावांतील अपयश झुगारत दुसऱ्या डावात धिम्या गतीचा शिक्का पुसला आणि वेगाने ४७ धावा केल्या. पहिल्या डावात अर्धशतक करणाऱ्या अक्षरने दुसऱ्या डावातही नाबाद ४१ धावा केल्या. साहा बाद झाल्यानंतर कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित केला नसता, तर अक्षरने आणखी एक अर्धशतक झळकावले असते. विश्रांतीनंतर ताजातवाना होऊन मुंबई कसोटीत खेळणाऱ्या विराटला पहिल्या डावात एजाझ पटेलने शून्यावर बाद केले होते. त्यामुळे दुसऱ्या डावात मात्र मोठी खेळी उभारण्याच्या इराद्याने विराटने संयमी ३६ धावा केल्या; परंतु त्यासाठी ८४ चेंडू घेतले.

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने टॉम लॅथम (६), विल यंग (२०) आणि रॉस टेलर (६) या आघाडीच्या फलंदाजांना तंबूची वाट दाखवत त्यांच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. मग डॅरेल मिचेल (६०) आणि हेन्री निकोल्स (खेळत आहे ३६) यांनी चौथ्या गडय़ासाठी ७३ धावांची भागीदारी केली; पण अक्षरने ही जोडी फोडण्यात यश मिळवले. उत्तरार्धात टॉम ब्लंडेलही धावचीत झाला. त्यामुळे मंगळवारी गोलंदाजांची स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कसोटी लागेल.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : ३२५

’ न्यूझीलंड (पहिला डाव) : ६२

’ भारत (दुसरा डाव) : ७० षटकांत ७ बाद २७६ (मयांक अगरवाल ६२, चेतेश्वर पुजारा ४७, शुभमन गिल ४७; एजाझ पटेल ४/१०६, रचिन रवींद्र ३/५६)

न्यूझीलंड (दुसरा डाव) : ४५ षटकांत ५ बाद १४० (डॅरेल मिचेल ६०, हेन्री निकोल्स ३६*; रविचंद्रन अश्विन ३/२७)

एजाझकडून बोथमचा विक्रम मोडित

पहिल्या डावात भारताचे १० बळी घेणारा किमयागार डावखुरा फिरकी गोलंदाज एजाझ पटेलने दुसऱ्या डावात चार बळी घेत कसोटी सामन्यामधील एकूण बळीसंख्या १४ पर्यंत नेली. यानिमित्ताने भारत दौऱ्यावर एका कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा परदेशी गोलंदाज हा इयान बोथमचा ४१ वष्रे जुना विक्रम एजाझने मोडित काढला. एजाझने ७३.५ षटकांत एकूण २२७ धावा देत एकूण १४ बळी मिळवले. १९८०मध्ये वानखडे स्टेडियमवरच बोथमने १०६ धावांत एकूण १३ बळी प्राप्त केले होते. याशिवाय न्यूझीलंडकडून सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजीच्या पंगतीत एजाझने दुसरे स्थान मिळवले. पहिल्या क्रमांकावरील रिचर्ड हॅडलीने १२३ धावांत एकूण १५ बळी मिळवले होते.

चौकार-षटकारांची आतषबाजी

भारताच्या ७० षटकांच्या दुसऱ्या डावात फलंदाजांनी २५ चौकार आणि ११ षटकारांची आतषबाजी केली. वृद्धिमान साहा वगळता सर्व फलंदाजांनी किमान एक षटकार तरी खेचला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs new zealand 2nd test day 3 at stumps nz five down need 400 runs to win zws

ताज्या बातम्या