Dinesh Karthik On Vaibhav Sooryavanshi: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात युवा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. इशान किशन दुखापतीमुळे दुसरा आणि तिसरा सामना खेळू शकला नव्हता. त्याच्याजागी वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली होती. दुसऱ्या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात डावाची सुरूवात करताना तो अर्धशतकाच्या जवळ पोहोचला होता. इशान किशन परतल्यानंतर वैभवला पुन्हा एकदा संघाबाहेर करण्यात आलं. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने वैभवला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्याचा पर्याय सुचवला आहे.
वैभव सूर्यवंशीला जेव्हा जेव्हा प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे, तेव्हा तेव्हा संजू सॅमसनला एकतर संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे किंवा मग त्याला आपल्या क्रमांकावर फलंदाजी करता आलेली नाही. दरम्यान दिनेश कार्तिकने असा एक पर्याय सुचवला आहे की, संजू सॅमसनला प्लेईंग ११ मधून बाहेर न करता वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये स्थान देता येईल.
क्रिकबझवर बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, “मला माहीत आहे, सर्वांना हेच हवंय की वैभव सूर्यवंशीने खेळावं. त्याला अभिषेक शर्माच्या जागी संधी दिली जाऊ शकते. असं झाल्यास अभिषेक शर्माला विश्रांती देता येईल आणि असं व्हायलाच हवं. कारण विषय जेव्हा वैभव सूर्यवंशीचा असतो, तेव्हा संजूला माघार घ्यावी लागते. पण जर तुम्हाला वैभवला खेळवायचं असेल, तर अभिषेकला विश्रांती देता येऊ शकते.”
संजू सॅमसनने गेल्या १० डावात फलंदाजी करताना ३ अर्धशतकं झळकावली आहेत. यापैकी २ अर्धशतकं हे त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना झळकावली होती. पण उर्वरीत ७ डावात तो हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. या ७ डावात तो २०-३० धावांचा पल्ला देखील गाठू शकलेला नाही. त्यामुळे संजू सॅमसनलाही पुनरागमन करण्याची संधी मिळायला हवी. त्यामुळे त्याला संधी मिळणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे अभिषेक शर्माने सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.
