Mohammad Kaif On Shreyas Iyer: भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना ऑकलँडच्या मैदानावर पार पडला. मालिकेतील सुरूवातीच्या ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. पण चौथ्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २५९ धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघाला २६० धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला १७२ धावांपर्यंत मजल मारता आली. पण भारतीय संघाला हा सामना ८७ धावांनी गमवावा लागला.

या मालिकेतही भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण गोलंदाज हवी तशी कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यामुळे अनेक दिग्गजांनी भारतीय संघावर टीका केली आहे. दरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक मोहम्मद कैफने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर मोठं वक्तव्य केलं आहे. मोहम्मद कैफ म्हणाला, “श्रेयस अय्यर ज्याप्रकारे गोलंदाजांचं रोटेशन करतो, ही त्याची कमकुवत बाजू आहे. हे फक्त एका सामन्यात पाहायला मिळालेलं नाही, तर आयपीएल स्पर्धेवेळी देखील हेच पाहायला मिळालं होतं. आयपीएल २०२६ स्पर्धेदरम्यान श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघाने अनेकदा एका डावात २०० हून अधिक धावा खर्च केल्या होत्या.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “यामागचं कारण, गोलंदाजीत केलेलं रोटेशन असू शकतं. हेच भारतीय संघाच्या बाबतीत देखील घडत आहे. आयर्लंडसारख्या संघाविरुद्ध, ज्या खेळाडूंची नावंही माहीत नाहीत. अशा संघाने १८० धावा कुटल्या. हेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही झालं आणि हेच सुरू आहे. भारतीय संघाचा विजय होतो, म्हणून या गोष्टी झाकल्या जातात. पण ही त्याच्या नेतृत्वातील कमकुवत बाजू आहे.”

आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “श्रेयस अय्यर ही गोष्ट शिकायची गरज आहे की, नितीश रेड्डी हा शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज नाही. मी अनेकदा पाहिलंय की, बुमराहच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग किंवा मग भुवनेश्वर कुमारसारख्या डेथ ओव्हर्स स्पेशिलिस्टकडून गोलंदाजी करून न घेता, नितीश रेड्डीला शेवटचं षटक दिलं गेलं आहे. बुमराहला वगळलं, तर केवळ दोनच असे गोलंदाज आहेत जे सुरूवातीचं आणि शेवटचं षटक टाकतात. सर्व संघ या दोघांचा वापर असाच करतात. पण जेव्हा श्रेयस अय्यर नेतृत्व करतो, त्यावेळी १५ षटकांतच अर्शदीपचे ३ षटकं टाकून झालेले असतात.१७ व्या आणि १९ व्या षटकासाठी प्रमुख गोलंदाजाचं षटक शिल्लक ठेवायला हवं. पण श्रेयस अय्यर असं करत नाही.”