ऑकलंड : पहिल्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांत धावांचा यशस्वी पाठलाग करत मालिकेत विजयी आघाडी घेणार्या भारताला न्यूझीलंडविरुद्ध आज, शुक्रवारी होणार्या चौथ्या सामन्यात संघनिवडीत प्रयोगाची संधी आहे. गेल्या काही महिन्यांत मर्यादित सामनेच खेळण्यास मिळालेल्या कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूंचा अंतिम ११ खेळाडूंत समावेश करण्याबाबत भारतीय संघ विचार करू शकेल. मात्र, संघाची फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत भक्कम ठेवण्याच्या धोरणात बदल करायचा की नाही, हा पेचही भारतीय संघासमोर आहे.
न्यूझीलंडच्या खडतर दौर्यावर भारतीय फलंदाजांचा कस लागणे अपेक्षित होते. मात्र, ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पध्र्यांवर वर्चस्व गाजवले. त्यामुळे मालिकेतील उर्वरित दोन सामने तुलनेने कमी दडपणाचे असले, तरी संघरचनेत बदल करताना व्यवस्थापनाला फलंदाजीची ताकद व गोलंदाजीतील विविधता यांचा समतोल साधावा लागेल.
चायनामन फिरकीपटू कुलदीपने अनेकदा मधल्या षटकांत बळी मिळवून संघासाठी आपले महत्त्व सिद्ध केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील ट्वेन्टी-२० मालिकेत त्याला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळालेले नाही.
डावखुरा अक्षर पटेल आतापर्यंत भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज राहिला आहे. मात्र, त्याला दोनच बळी मिळवता आले असून त्याने षटकामागे ९.५८ धावा (इकॉनॉमी) खर्ची केल्या आहेत. अष्टपैलू नमन धीरने आतापर्यंत केवळ एक षटक टाकले आहे. अशा परिस्थितीत फिरकी विभागातील पर्यायांची चाचपणी करण्याच्या दृष्टीने भारतासाठी चौथा सामना उपयुक्त ठरू शकतो. न्यूझीलंडसाठी भारतीय आघाडीच्या फलंदाजांना रोखणे हे सर्वांत मोठे आव्हान ठरले आहे. कर्णधार मिचेल सँटनरने डावखुरी फिरकी प्रभावीपणे टाकली असली, तरी अन्य गोलंदाजांकडून त्याला अपेक्षित साथ मिळालेली नाही.
‘छोटे’ मैदान…
ऑकलंड येथील ईडन पार्क मैदानाची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. त्यातच सीमारेषा तुलनेने जवळ आहेत. त्यामुळे अभिषेक, सूर्यवंशी, सॅमसन यांसारखे आक्रमक फलंदाज समोर असताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांना मोठे आव्हान पेलावे लागेल. तसेच या सामन्यासाठी विक्रमी ४० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीचा अंदाज आहे.
इशानबाबत संभ्रम कायम
* दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांना मुकलेल्या इशान किशनच्या उपलब्धतेबाबत अद्याप स्पष्टता नाही. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास वैभव सूर्यवंशीला आणखी एक संधी मिळू शकते.
* वेलिंग्टनमधील गेल्या सामन्यात सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी करताना शतकवीर अभिषेक शर्माला तोलामोलाची साथ दिली होती. मात्र, इशान या सामन्यात खेळण्यास सज्ज असल्यास भारतासमोर मोठा पेच निर्माण होईल.
* अभिषेकचे स्थान निश्चित असून इशानला पुन्हा संघात घ्यायचे झाल्यास भारतीय संघ व्यवस्थापनाला सूर्यवंशी आणि संजू सॅमसन यांच्यापैकी एकाला वगळण्याचा अवघड निर्णय घ्यावा लागू शकेल. तसेच कर्णधार श्रेयस अय्यरवरही कामगिरी उंचावण्यासाठी दडपण आहे.
* अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने वेलिंग्टन येथे झालेल्या गेल्या सामन्यात अखेरच्या षटकांत अचूक टप्प्यावर चेंडू टाकत आपली गुणवत्ता दाखवून दिली. मात्र, मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत त्याने ७२ चेंडूंत १३९ धावा दिल्या आहेत. त्यामुळे धावा रोखण्याच्या बाबतीत त्याला अधिक प्रभावी कामगिरी करावी लागेल. * वेळ : दुपारी १२.३० वा. * थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३, सोनी लिव्ह ॲप.
