Thiruvananthapuram Cricket / पीटीआय, थिरुवनंतपुरम : आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी अखेरच्या सामन्यात भारतीय संघ आज, शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळेल, तेव्हा घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यासह यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचा पुन्हा लय मिळवण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे अक्षर पटेलच्या तंदुरुस्तीवरही लक्ष असणार आहे.

विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने काही प्रयोग केले. त्यांनी पाच विशेषज्ञ गोलंदाज खेळवले आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या, शिवम दुबे यांना गोलंदाजी दिली नाही. भारताला ही लढत गमवावी लागली. मात्र, भारताने मालिका याआधीच जिंकल्याने या सामन्यातील निकालाचा फारसा परिणाम झाला नाही. आता आज होणार्‍या मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघ गोलंदाजीत पुन्हा एकदा बदल करू शकतो. गेल्या दोन सामन्यांत विश्रांती दिल्यानंतर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

फलंदाजीत फारसा बदल अपेक्षित नसला, तरी सॅमसन कामगिरी उंचावेल अशी आशा संघ व्यवस्थापनाला असेल. या मालिकेत चार सामन्यांत मिळून सॅमसनला केवळ ४० धावा करता आल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे, गोलंदाजाने चांगला चेंडू टाकून त्याला बाद करण्यापेक्षा, तो अगदी साधारण चेंडूवर खराब फटका मारून सातत्याने बाद आहे.

भारतीय संघाकडे इशान किशनच्या रूपात सॅमसनचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. किशनने या मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, दुखापतीमुळे त्याला गेल्या सामन्यात खेळता आले नाही. अष्टपैलू अक्षर पटेलही नागपूर येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यानंतर बोटाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. अक्षरने विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या सामन्यापूर्वी सराव सत्रात गोलंदाजी केली होती. त्यामुळे आजच्या लढतीत किशन आणि अक्षरचे पुनरागमन अपेक्षित आहे.

  • वेळ : सायं. ७ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.