India vs New Zealand 2nd Test Updates in Marathi: भारतीय संघ किवी संघाविरूद्धाच्या दुसऱ्या कसोटीत फिरकीपटूंसमोर सपशेल फेल ठरले. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. येथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अधिक अनुकूल होती. याचा प्रत्यय सामन्यातील पहिल्या दोन दिवसात आला, म्हणजेच भारताच्या दोन्ही फिरकीपटूंनी १० विकेट्स घेतले तर न्यूझीलंडच्या दोन फिरकीपटूंनी ९ विकेट्स घेतले. अशारितीने पहिल्या डावात किवी संघाने २५९ धावा करत सर्वबाद झाला तर भारतीय संघाला फक्त १५६ धावा करता आल्या.
भारतीय संघाची फलंदाजी बाजू फिरकीपटूंसमोर लोटांगण घालताना दिसली. फिरकीसाठी अनुकूल असलेल्या ट्रॅकवर भारतीय संघाचे फलंदाज फलंदाजी करण्यात पटाईत असल्याचे कायम म्हटले जाते. पण यावेळेस मात्र भारतीय संघाच्या फलंदाजांची फिरकीपटूंनी भंबेरी उडवली. भारताची कमजोर फलंदाजी पाहून न्यूझीलंड संघाचे माजी खेळाडू सायमन डूल यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
हेही वाचा – IND vs NZ: विराट कोहली आणि टीम साऊदी खरंच एकमेकांशी भांडत होते का? अंपायरसमोरचा ‘तो’ VIDEO व्हायरल
न्यूझीलंडचे माजी खेळाडू सायमन डूल भारताची कामगिरी पाहून म्हणाले, “भारतीय फलंदाज फिरकीविरूद्ध चांगली कामगिरी करतात हा केवळ एक गैरसमज राहिला आहे. तेही इतर संघातील फलंदाजांसारखेच खेळतात. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि गांगुलीचे ते दिवस गेले. आता भारतीय फलंदाज इतर खेळाडूंप्रमाणेच खेळतात. एखादा चांगला फिरकीपटू गोलंदाजी करायला आला की भारतीय खेळाडू गडबडतात. आयपीएलमध्येही आम्ही पाहिलंय की फिरकी गोलंदाजीला सुरूवात झाली की ते गोंधळतात आणि मग तक्रार करू लागतात.”
आकडेवारी आपण पाहिली तर २०२२ पासून, भारतीय फलंदाजांना घरच्या मैदानावर फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण झालं आहे. २०२० पासून घरच्या मैदानावर भारतीय फलंदाजांची सरासरी घसरल्याचे दिसत आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीची सरासरी २०१३ ते २०१९ दरम्यान ७२.४५ होती. ज्यावरून ती ३२.८६ पर्यंत घसरली आहे तर कर्णधार रोहित शर्माची सरासरी ८८.३३ वरून ३७.८३ पर्यंत घसरली आहे.
हेही वाचा – IND vs NZ: भारतीय फलंदाजांची पुन्हा उडाली दाणादाण, १५६ वर टीम इंडिया ऑल आऊट; सँटनरच्या फिरकीसमोर टेकले गुडघे
अजिंक्य रहाणे (१८.८७), चेतेश्वर पुजारा (२४.५३) आणि केएल राहुल (२९.३३) यांसारख्या इतर अव्वल खेळाडूंचीही फिरकीपटूंविरूद्ध खेळण्याची सरासरी घसरली आहे. असे असूनही, भारताने २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची मालिका गमावल्यानंतर मायदेशात आपला अपराजित विक्रम कायम राखण्यात यश मिळविले आहे. मात्र, पुण्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावातील कामगिरी पाहता भारत तब्बल ११ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावण्याच्या मार्गावर आहे.
भारतीय क्रिकेट संघाने आशियाई जायंट्सने सलग १८ विजयांसह घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे पहिल्या डावात १०३ धावांची भक्कम आघाडी मिळाल्यानंतर भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी विशेष कामगिरी करावी लागणार आहे.