India vs New Zealand Head To Head Record: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करणारे दोन्ही संघ ठरले आहेत. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. तर भारतीय संघाने इंग्लंडला सेमी फायनलमध्ये प्रवेश करून फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. हा सामना ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ चौथ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर न्यूझीलंडकडे पहिल्यांदाच ही ट्रॉफी उंचावण्याची संधी असणार आहे. दरम्यान कसा आहे या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

भारत विरूद्ध न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आंतरराराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत ३० वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १८ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. यादरम्यान एका सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता. मायदेशात खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. भारताने १६ पैकी ११ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये कसा आहे दोन्ही संघांचा रेकॉर्ड

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. पण टी-२० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरूद्ध खेळताना भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ ३ वेळेस आमनेसामने आले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. २००७, २०१६ आणि २०२१ मध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत केलं आहे.

भारतीय संघाचा दमदार फॉर्म

भारतीय संघाने साखळी फेरीत दमदार कामगिरी केली होती. भारताने साखळी फेरीत एकही सामना गमावला नव्हता. पण सुपर ८ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेला हरवून भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना इंग्लंडविरूद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २५३ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. इंग्लंडला २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडने हा सामना अवघ्या ७ धावांनी गमावला. तर दुसरीकडे न्यूझीलंडने पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला.