संघ निवडीवर अजित आगरकर, गौतम गंभीर यांचे वर्चस्व अपेक्षित
नवी दिल्ली : निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी जबाबदारी सांभाळल्यापासून संघाच्या गरजेनुसार खेळाडूंची निवड करण्याचे अवलंबलेले धोरण न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कायम राहील असेच मानले जात आहे. मालिकेसाठी आज, शनिवारी संघ निवड होईल. तेव्हा हाच एकमेव निकष राहणार असून, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि गोलंदाज मोहम्मद सिराज यांचे एकदिवसीय भवितव्य निश्चितपणे चर्चेचा विषय ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकलेल्या संघात फार मोठे बदल अपेक्षित नसले, तरी यष्टिरक्षक फलंदाज आणि वेगवान गोलंदाजांच्या निवडीवर अधिक चर्चा होऊ शकते. एकदिवसीय सामन्यांसाठी यापूर्वीच के.एल. राहुल याची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. अशा वेळी दुसरा यष्टिरक्षक म्हणून कोणाला पसंती द्यायची यावर बैठकीत चांगलाच खल होईल. मुश्ताक अली आणि विजय हजारे चषक क्रिकेट इशान किशनने मधल्या फळीत आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली आहे. ध्रुव जुरेलनेही धावांचे सातत्य राखले आहे. आगरकर आणि गंभीर या दोघांनीही संघ निवडताना कायम संघाच्या गरजेनुसार खेळाडूंची निवड केली आहे.
निव्वळ यष्टिरक्षक की फलंदाज
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत संजू सॅमसन आणि इशान किशन या दोन सलामीला खेळू शकणाऱ्या यष्टिरक्षकांना निवड समितीने पसंती दिली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षकाने मधल्या फळीत फलंदाजी करण्याची अपेक्षा असते. त्यामुळेच इशान किशन, ध्रुव जुरेल यांचे पारडे जड राहते. विशेष म्हणजे गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून पंतने जुलै २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत केवळ एक एकदिवसीय सामना खेळला आहे. आठ वर्षांत त्याच्या नावावर केवळ ३१ एकदिवसीय सामन्यांची आणि ३५ पेक्षा कमी सरासरीची नोंद आहे. अर्थात, त्याला अजिबात संधी न देता संघातून वगळल्यास काही गैरसोयीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, याचा विचार निवड समिती करेल अशी अपेक्षा आहे.
वेगवान गोलंदाज कोण
वेगवान गोलंदाजीबाबत अशीच काहीशी चर्चा अपेक्षित आहे. एकदिवसीय मालिकेसाठी बुमरा आणि हार्दिक पंड्या यांना विश्रांती मिळू शकते. अशा वेळी हर्षित राणा, अर्शदीप सिंग यांनाही विश्रांती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहम्मद सिराजदेखील ऑस्ट्रेलियातील दौऱ्यानंतर एकदिवसीय संघाचा सदस्य राहिलेला नाही. हजारे चषक स्पर्धेतदेखील तो अजून खेळलेला नाही. दुखापतीतून बरे होऊन शमी देशांतर्गत स्पर्धेत खेळत असला, तरी त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सर्वोत्तम वेळ निघून गेली आहे, असा एक मतप्रवाह आहे. त्याच वेळी शमी आणि निवड समिती यांच्यातही फारसा संवाद राहिलेला नाही. अशा वेळी वेगवान गोलंदाज म्हणून कोणाची निवड होणार हेच या वेळी आकर्षण राहणार आहे.
सर्फराज, पडिक्कलमध्ये स्पर्धा
न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजीसाठी विजय हजारे चषक स्पर्धेत सातत्याने धावा करणारे सर्फराज खान चौथा क्रमांक, तर देवदत्त पडिक्कल सलामीसाठी संघात स्थान होण्याची आस बाळगून असतील. यातही शुभमन गिल, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल यांचे स्थान निश्चित असल्यामुळे पडिक्कलला संघात स्थान मिळणे जरा कठीण होईल. हजारे चषक स्पर्धेत सर्फराज खेळला असला, तरी त्याची तुलना ऋतुराज गायकवाडशी होऊ शकेल. ऋतुराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी करून आपले स्थान भक्कम केल्यासारखे आहे. अर्थात, हे सगळे निवड समितीचे पाच सदस्य कसा विचार करतात यावर अवलंबून राहील. त्यांनी आहे तोच संघ कायम ठेवायचे ठरवल्यास ही सर्व अपेक्षित चर्चेचा काही फायदा होणार नाही.
