भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत विराट कोहली बाद झाल्यानंतर वादाला तोंड फुटले. क्रिकेट चाहत्यांपासून ते अनेक माजी खेळाडूंनी कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट देण्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांनीही विराट कोहलीला आऊट दिल्याबद्दल थर्ड अंपायरची खरडपट्टी काढली. कानपूर कसोटीत कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. मुंबई कसोटीत भारताच्या पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला. भारताच्या डावाच्या ३०व्या षटकात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने विराटला बाद केले.

परेश रावल यांनी थर्ड अंपायरवर ट्विट करत टीका केली आहे. ‘हे थर्ड अंपायर आहे की थर्ड क्लास अंपायरिंग?’, असे परेश रावल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एजाज पटेलचा चेंडू कोहलीच्या पॅडला लागला. कोहलीला मैदानावरील पंच अनिल चौधरी यांनी आऊट दिले. कोहलीला खात्री होती की चेंडू आधी त्याच्या पॅडला लागला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी डीआरएस घेतला. चेंडू त्याच्या बॅटला आणि पॅडला लागल्याचे रिव्ह्यूमध्ये आढळून आले. पण चेंडू आधी कोहलीच्या पॅडला लागला की बॅटला, की दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्या हे शोधणं कठीण होतं. तिसरे पंच वीरेंद्र शर्मा यांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवले आणि त्याला बाद घोषित केले.

पंचांच्या या निर्णयामुळे कोहलीही चांगलाच संतापला होता. मैदानाबाहेर जाण्यापूर्वी तो मैदानावरील पंच नितीन मेनन रे यांच्याशी चर्चा करताना दिसला. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने निराशेने आपली बॅटही सीमारेषेजवळ आदळली.

IND vs NZ : विराटचं ‘कमबॅक’ फसलं..! मुंबईत भारताचा कप्तान शून्यावर बाद; ‘असा’ काढला राग; पाहा VIDEO

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही या प्रकरणी आपले मत व्यक्त करत विराटला नॉटआऊट म्हटले आहे. विराटला पंचांनी आऊट दिल्यानंतर कोहलीच्या बॅटच्या आतील काठालाही लागल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. मात्र, चेंडू आधी बॅटला लागला की पॅडला, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

शून्यावर बाद झाल्याने विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन निराशाजनक होते. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतून आणि पहिल्या कसोटी सामन्यातून विराटला विश्रांती देण्यात आली होती. विराट शानदार खेळी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण तसे झाले नाही आणि तो खाते न उघडताच बाद झाला. यासह त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. कसोटी कर्णधार म्हणून १० वेळा खाते न उघडता बाद होणारा विराट आता पहिला भारतीय ठरला आहे. याशिवाय एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शून्यावर बाद झालेल्या भारतीय कसोटी कर्णधारांच्या यादीत विराट कोहलीने बिशनसिंग बेदी, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी यांच्यासह शीर्षस्थानी आपले स्थान निर्माण केले आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावा केल्या होत्या. मयंक अग्रवाल १२० आणि रिद्धिमान साहा २५ धावांवर नाबाद आहे.