मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला तब्बल ३७२ धावांनी नमवले आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात १६७ धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर केला. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला. न्यूझीलंडला पहिल्या डावात अवघ्या ६२ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ७ बाद २७६ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. या घोषणेसह भारताने न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य दिले, पण पाहुण्यांना हे आव्हान पेलवले नाही. या विजयासह भारताने ही मालिका १-० अशी जिंकली सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत १२ गुणांची कमाई केली. याआधी भारताने २०१५मध्ये दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३७ धावांनी विजय नोंदवला होता. मयंक अग्रवालला सामनावीर तर रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

न्यूझीलंडचा दुसरा डाव

भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कप्तान टॉम लॅथमला (६) स्वस्तात बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर अश्विनने विल यंग (२०) आणि रॉस टेलर (६) यांनाही तंबूत मार्ग दाखवत न्यूझीलंडची अवस्था खिळखिळी केली. ३ बाद ५५ अशी धावसंख्या असताना डॅरिल मिशेलने किल्ला लढवला. त्याला हेन्री निकोल्सची साथ लाभली. या दोघांनी संघाचे शतक पूर्ण केले. विराटने अक्षर पटेलला चेंडू सोपवला आणि अक्षरने मिशेलला जयंत यादवकरवी झेलबाद करत ही भागीदारी मोडली. मिशेलने ७ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या. मिशेलनंतर आलेला यष्टीरक्षक टॉम ब्लंडेल खातेही न उघडता धावबाद झाला. १२९ धावांत न्यूझीलंडने ५ फलंदाज गमावले. चौथ्या दिवशी जयंत यादवने रचिन रवींद्रला (१८) पुजाराकरवी झेलबाद करत न्यूझीलंडला सहावा धक्का दिला. त्यानंतर पुढच्या पाच धावांत न्यूझीलंडने आपले चारही फलंदाज गमावले आणि त्यांचा दुसरा डाव ५६.३ षटकात १६७ धावांत संपुष्टात आला. फिरकीपटू जयंत यादव आणि अश्विनने प्रत्येकी ४ बळी घेतले.

हेही वाचा – PHOTOS : आज एक-दोन नव्हे, तर टीम इंडियाच्या ५ क्रिकेटपटूंचा आहे ‘बर्थडे’; पाहा कोण आहेत ते

भारताचा दुसरा डाव

क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्यामुळे शुबमन गिलऐवजी चेतेश्वर पुजाराने मयंक अग्रवालसोबत सलामी दिली. या दोघांनी चांगली सलामी देत संघाचे शतक फलकावर लावले. पहिल्या डावात शतक ठोकलेल्या मयंकने दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी करत अर्धशतक ठोकले, तर चेतेश्वर पुजारा त्याच्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचला. पहिल्या गड्यासाठी १०७ धावा उभारल्यानंतर फिरकीपटू एजाज पटेलने ही जोडी तोडली. त्याने प्रथम मयंक अग्रवालला त्यानंतर चेतेश्वर पुजाराला बाद केले. मयंकने ९ चौकार आणि एका षटकारासह ६२ तर पुजाराने ६ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावा केल्या. त्यानंतर कप्तान विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू रचिन रवींद्रला मोठा फटका खेळण्याच्या नादात गिल बाद झाला. तर रचिन नेच विराटचा अडथळा दूर केला. गिलने ४ चौकार आणि एका षटकारासह ४७ तर कोहलीने ३६ धावा केल्या त्यानंतर आलेल्या फलंदाजांमध्ये अक्षर पटेलने आक्रमक फलंदाजी करत २६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४१ धावा चोपल्या. भारताने आपला दुसरा डाव ७० षटकात ७ बाद २७६ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य दिले. न्यूझीलंडकडून एजाजने ४ तर रचिनने ३ बळी घेतले.

न्यूझीलंडचा पहिला डाव

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भन्नाट गोलंदाजी करत न्यूझीलंडला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने कप्तान टॉम लॅथम (१०), विल यंग (४) आणि रॉस टेलर (१) यांना बाद करत तीन धक्के दिले. सिराजने टेलरची दांडी गुल केली. त्यानंतर फिरकीपटू अक्षर पटेलने डॅरिल मिशेलला (८) पायचीत पकडल न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. विराटने रवीचंद्रन अश्विनला चेंडू सोपवला आणि अश्विनने हेन्री निकोल्सची (७) दांडी गुल केली. अवघ्या ३१ धावांत न्यूझीलंडचे ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर न्यूझीलंडचे इतर फलंदाज बाद करण्यात भारताने जास्त वेळ गमावला नाही. अवघ्या ६२ धावांत न्यूझीलंडचा पहिला डाव संपुष्टात आला. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने ८ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद सिराजने ३ तर अक्षर पटेलने २ बळी घेतले. जयंत यादवला एक बळी मिळाला.

भारताचा पहिला डाव

भारताचे सलामीवीर शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८० धावा केल्या. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने गिलला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. गिलने ७ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. त्यानंतर चहापानापर्यंत भारताला अजून दोन धक्के बसले. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि कप्तान विराट कोहली यांना एजाजनेच शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर आणि मयंकने किल्ला लढवला. या दोघांनी संघाला दीडशे धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दरम्यान मयंकने आपले अर्धशतकही पूर्ण केले. एजाजने पुन्हा गोलंदाजीला येत ही भागीदारी मोडली. त्याने श्रेयसला (१८) यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर मयंकने वृद्धिमान साहाला सोबत घेत धावसंख्या वाढवली. मयंकने आपले शतक पूर्ण केले. मयंक-साहाने संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. एजाजने ही भागीदारी फोडली. त्याने प्रथम वृद्धिमान साहा (२७) त्यानंतर रवीचंद्रन अश्विनला (०) माघारी धाडले. सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर मयंकसोबत अक्षर पटेलने अर्धशतकी भागीदारी रचली. त्यानंतर एजाजने भारताला अजून दोन धक्के दिले. त्याने दीशतक ठोकलेल्या मयंकला आणि त्यानंतर अक्षरला बाद करत आपला आठवा बळी नोंदवला. मयंकने १७ चौकार आणि ४ षटकारांसह १५० तर अक्षरने ५ चौकार आणि एका षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. त्यानंतर एजाजने जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांचा अडथळा यांचा अडथला दूर करत विक्रमी १० विकेट्स घेतले. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर आटोपला. एजाज पटेलने ४७.५ षटकात ११९ धावांत १० बळी घेतले.

हेही वाचा – VIDEO : दिल तो बच्चा है जी..! पावसाच्या पाण्यात बांगलादेशच्या महान क्रिकेटपटूनं केला ‘असा’ प्रकार; मैदानात धावत गेला अन्…

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – मयंक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड – विल यंग, ​​टॉम लॅथम (कप्तान), डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, काइल जेमीसन, टिम साऊदी, विल सोमरविले, एजाज पटेल.