करोनामुळे आयपीएल २०२१ नंतर भारताबाहेर टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जात आहे. बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजक आहे. विश्वचषकानंतर न्यूझीलंड संघाला भारत दौऱ्यावर यायचे आहे. त्यांना येथे तीन टी-२० व्यतिरिक्त दोन कसोटी खेळायच्या आहेत. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) चा भाग आहे. याच मालिकेसाठी स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांबद्दल चांगली बातमी येत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ३ ते ७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो. ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने हा सामना आयोजित केला जाण्याची चिन्हे आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) सामन्यादरम्यान तिकीट दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. एका सूत्राने सांगितले, “तिकिटाचे दर बऱ्याच काळापासून वाढलेले नाहीत. प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले आहेत. याशिवाय, केवळ ५० टक्के चाहत्यांना परवानगी द्यायची आहे. पण ही गोष्ट एमसीएशी संलग्न क्लब यांना लागू होणार नाही.”

हेही वाचा – टीम इंडियाला धक्क्यावर धक्के..! रवी शास्त्रींसह ‘दिग्गज’ व्यक्ती सोडणार संघाची साथ

न्यूझीलंड संघाने आतापर्यंत भारतात कसोटी मालिका जिंकलेली नाही. भारतामध्ये आतापर्यंत दोन्ही देशांदरम्यान एकूण ११ मालिका खेळल्या गेल्या आहेत. २०१६-१७मध्ये खेळलेल्या शेवटच्या ३ सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने ३-०ने विजय मिळवला. या दोघांदरम्यान भारतात एकूण ३४ कसोटी खेळल्या गेल्या आहेत. टीम इंडियाने १६ तर न्यूझीलंडने फक्त २ सामने जिंकले आहेत. १६ सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला टी-२० – १७ नोव्हेंबर, जयपूर
  • दुसरा टी-२० – १९ नोव्हेंबर, रांची
  • तिसरा टी-२० – २१ नोव्हेंबर, कोलकाता
  • पहिली कसोटी – २५-२९ नोव्हेंबर, कानपूर
  • दुसरी कसोटी – ०३-०७ डिसेंबर, मुंबई