scorecardresearch

Ind vs NZ: “हे तर ट्रेंट बोल्टने माझ्या बायकोला दिलेलं बर्थडे गिफ्ट”; सामना संपल्यानंतर सूर्यकुमारची मिश्कील टिप्पणी

भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून मात केली.

India vs New Zealand, Suryakumar Yadav, सूर्यकुमार यादव, Trent Bolt,
भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून मात केली.

Ind vs NZ Suryakumr Yadav: भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून मात केली. सूर्यकुमार यादव (४० चेंडूंत ६२ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (३६ चेंडूंत ४८) या मुंबईकरांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवला. यासोबतच रोहित आणि राहुल द्रविड या कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाचाही विजयी प्रारंभ झाला.

के एल राहुलची विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक लगावलं. विराट कोहलीच्या अनुपस्थित सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे, ४० चेंडूत ६२ धावा करताना सुर्यकुमारने तीन षटकार आणि सहा चौकार ठोकले. सुर्यकुमारला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका : भारताच्या विजयात मुंबईकर चमकले

दरम्यान १६ व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवला जीवनदान मिळालं. ट्रेंट बोल्टने सूर्यकुमार यादवचा झेल सोडला आणि चेंडू सीमापार गेला. सामना संपल्यानंतर सूर्यकुमारने बोल्टचे आभार मानले. आजा माझ्या बायकोचा वाढदिवस असून हे परफेक्ट गिफ्ट असल्याचं मिश्किलपणे सूर्यकुमारने म्हटलं.

“मी काहीच वेगळं केलं नाही”

“मी काहीही वेगळं केलेलं नसून, गेल्या तीन ते चार वर्षांपासून जे करत होतो तेच केलं. मी नेटमध्येही त्याच पद्धतीने खेळतो आणि सामन्यातही. नेटमध्ये खेळताना मी स्वत:वर खूप दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. नेटमध्ये खेळताना आऊट झाल्यानंतर मी नेमकं काय चुकलं याचा विचार करतो आणि याचा फायदा मला मैदानात खेळताना होतो,” असं सूर्यकुमारने सांगितलं आहे.

सामन्यात नेमकं काय झालं –

जयपूर येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठत तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार रोहित आणि के. एल. राहुल (१५) यांनी पाच षटकांतच भारताचे अर्धशतक फलकावर लावले. मिचेल सँटनरने राहुलला बाद करत भारताला पहिला झटका दिला. रोहितला मग सूर्यकुमारची उत्तम साथ लाभली. त्यांनी ५९ धावांची भागीदारी रचल्यावर ट्रेंट बोल्टने रोहितला माघारी पाठवले. सूर्यकुमारने फटकेबाजी सुरु ठेवत ३४ चेंडूंत अर्धशतक झळकावले. मात्र, स्वीप मारण्याचा प्रयत्न करताना बोल्टने त्याचा त्रिफळा उडवला. सूर्यकुमारच्या ६२ धावांच्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तो बाद झाल्यावर ऋषभ पंतने (नाबाद १७) महत्वाचे योगदान देत भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६४ अशी धावसंख्या उभारली. भुवनेश्वर कुमारने डॅरेल मिचेलला (०) पहिल्याच षटकात बाद केल्यावर अनुभवी मार्टिन गप्टिल (४२ चेंडूंत ७०) आणि मार्क चॅपमन (५० चेंडूंत ६३) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १०९ धावांची भागीदारी रचल्यावर चॅपमनचा फिरकीपटू अश्विनने त्रिफळा उडवला. गप्टिलने मात्र मोठे फटके खेळल्याने न्यूझीलंडला १६० धावांचा टप्पा पार करता आला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2021 at 09:04 IST
ताज्या बातम्या