India vs New Zealand Pitch Report: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार रांगणार आहे. हा सामना ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पहिल्यांदाच टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी या स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. त्यामुळे अंतिम फेरीतही दोन्ही संघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल? जाणून घ्या पीच रिपोर्ट.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी जी खेळपट्टी तयार केली जाणार आहे त्यात लाल आणि काळया मातीचा वापर केला जाणार आहे. लाल मातीचा वापर जास्त प्रमाणात केला जाणार असल्याने ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल ठरेल. चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर येतो. त्यामुळे धावा करणं सोपं होतं. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही लाल मातीची खेळपट्टी तयार करण्यात आली होती. या सामन्यात धावांचा पाऊस पाडला गेला होता. त्यामुळे दोन्ही डावात मिळून तब्बल ४९९ धावा कुटल्या गेल्या होत्या. असच काहीसं चित्र या सामन्यातही पाहायला मिळू शकतं.

या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा या दोन्ही संघांमधील सामना पार पडला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २१३ धावा चोपल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कॅनडाला १५६ धावांपर्यंत मजल मारता आली होती. या मैदानावर मोठी धावसंख्या उभारली जाते. त्यामुळे अंतिम सामना हाय स्कोअरिंग होऊ शकतो.

याआधी भारतीय संघ २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी खेळपट्टी बनवण्यासाठी काळया मातीचा वापर करण्यात आला होता. काळया रंगाच्या मातीचा वापर केलेली खेळपट्टी संथ असते. त्यामुळे धावा करणं जड जातं. पण लाल मातीची खेळपट्टी असल्याने फलंदाजांना धावा करणं सोपं होईल. हे मैदान भारतासाठी आतापर्यंत तरी अनलकी राहिलं आहे. कारण भारतीय संघाला २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता. तर आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत भारताला दक्षिण आफ्रिकेकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला.