IND vs NZ 1st Test : न्यूझीलंडचं भारताला चोख प्रत्युत्तर; दुसऱ्या दिवसअखेर लॅथम आणि यंगची अर्धशतके!

कानपूरमध्ये खेळवला जातोय सामना

india vs new zealand test series first test at kanpur day two
भारत वि. न्यूझीलंड पहिला कसोटी सामना

कानपूर येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस पाहुण्यांसाठी चांगला ठरला. न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर ५७ षटकात बिनबाद १२९ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडला संघ अजून २१६ धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दमदार सुरुवात केली. तत्पूर्वी, आज लंचनंतर भारताचा पहिला डाव १११.१ षटकात ३४५ धावांवर आटोपला. आपल्या पदार्पणाचा कसोटी सामना खेळणारा मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने १०५ धावांची शतकी खेळी केली. तर सलामीवीर शुबमन गिलने ५२ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून टिम साऊदीने अर्धा संघ गारद केला.

न्यूझीलंडचा पहिला डाव

न्यूझीलंडसाठी टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी न देता दुसऱ्या दिवसअखेरपर्यंत फलंदाजी केली. लॅथमने ४ चौकारांसह ५० तर यंगने १२ चौकारांसह नाबाद ७५ धावा केल्या आहेत.

भारताचा पहिला डाव

भारताचा सलामीवीर शुबमन गिलची ५२ धावांची खेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. गिलने पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात न्यूझीलंडवर हल्लाबोल चढवला. गिलने ५ चौकार आणि एका षटकार ठोकला. वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने त्याला बोल्ड केले. गिलचा सहकारी मयंक अग्रवाल (१३) स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर आलेले चेतेश्वर पुजारा (२६), कर्णधार अजिंक्य रहाणे (३५) यांनी छोटेखानी खेळी करत भारतासाठी धावा जोडल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. या दोघांनी १२१ धावांची भागीदारी रचली.

हेही वाचा – मोठी बातमी..! ऑस्ट्रेलियाला मिळाला ‘नवा’ कप्तान; स्टीव्ह स्मिथकडे उपकर्णधारपद!

श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या सामन्यात छाप सोडली आणि नाबाद शतक झळकावले. तर जडेजाने ५० धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने जडेजाला लवकर माघारी धाडले. जडेजाने ६ चौकारांसह ५० धावा केल्या. त्यानंतर अय्यरने वृद्धिमान साहाला सोबत घेत धावा जोडल्या. याच सत्रात अय्यरने जेमीसनच्या गोलंदाजीवर शतक झळकावले. पदार्पणात शतक झळकावणारा श्रेयस १६वा भारतीय ठरला. पुढच्या दोन षटकात भारताने साहाला (१) गमावले. साऊदीने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. भारताच्या तीनशे धावा फलकावर लागल्यानंतर श्रेयस माघारी परतला. साऊदीने त्याला १०५ धावांवर तंबूत धाडले. श्रेयसने १३ चौकार आणि २ षटकार ठोकले. श्रेयसनंतर अश्विनने लंचपर्यंत किल्ला लढवला. लंचनंतर फिरकीपटू एजाज पटेलने अश्विनला बोल्ड केले. अश्विनने ५ चौकारांसह ३८ धावा केल्या. पटेलने इशांत शर्माला पायचीत पकडत भारताचा पहिला डाव ३४५ धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडून साऊदीने ६९ धावांत ५, जेमीसनने ३ तर पटेलने २ बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – अजिंक्य रहाणे (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि उमेश यादव.

न्यूझीलंड – टॉम लॅथम, विल यंग, ​​केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर) , रचिन रवींद्र, टिम साऊदी, एजाज पटेल, काइल जेमीसन, विल सोमरविले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs new zealand test series first test at kanpur day two adn

ताज्या बातम्या