IND vs NZ 3rd T20 : रोहित-राहुलनं पहिली ‘मोहीम’ केली फत्ते..! टीम इंडियाचा ३-०ने मालिकाविजय

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतानं न्यूझीलंडला ७३ धावांनी मात दिली.

india vs new zealand third t20 match report
भारताचा मालिकाविजय

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७३ धावांनी विजय मिळवला. यासह भारताचा नवा कप्तान रोहित शर्मा आणि नवा हेड कोच राहुल द्रविड यांनी पहिली मोहीम फत्ते करत तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले आहे. रोहितने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने ईडनवर आपला खेळ पुन्हा बहरत मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक ठोकले. रोहितच्या ५६ धावा आणि शेवटी दीपक चहरने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २० षटकात ७ बाद १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे फलंदाज १७.२ षटकात १११ धावांवर ढेपाळले. भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक ९ धावांत ३ बळी घेतले. तर हर्षलला २ बळी घेता आले. अक्षरला सामनावीर, तर रोहितला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

न्यूझीलंडचा डाव

कोलकात्यात दवाचा परिणाम होईल, असे वाटत असताना भारताने गोलंदाजीत दमदार सुरुवात केली. त्यांनी न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन आणि ग्लेन फिलिप्स यांना पॉवरप्लेमध्ये बाद केले. सलामीवीर मार्टिन गप्टिलने पुन्हा एकदा भारतासमोर प्रभावी ठरत अर्धशतक ठोकले. त्याने ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावा केल्या. आज संधी मिळालेल्या यजुर्वेंद्र चहलने ११व्या षटकात माघारी पाठवले. गप्टिलनंतर मात्र न्यूझीलंडचे इतर फलंदाजांना तंबूत पाठवण्याच भारतीय गोलंदाजांनी उशीर केला नाही. १११ धावांवर न्यूझीलंडचा संघ तंबूत परतला.

भारताचा डाव

केएल राहुलबदली संधी मिळालेल्या इशान किशनसोबत रोहित शर्माने सलामी दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी फलकावर लावली. दोघांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू लागला. पण कप्तान मिचेल सँटनरने सातव्या षटकात किशन (२९) आणि सूर्यकुमार यादव (०) यांना तंबूत धाडले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतलाही (४) मोठी खेळी करता आली नाही. दुसऱ्या बाजूला स्थिरावलेल्या रोहितचेही संतुलन ढासळले आणि तो संघाचे शतक फलकावर लावून तंबूत परतला. फिरकीपटू ईश सोधीने त्याचा अप्रतिम झेल टिपल. रोहितने ३ चौकार आणि ६ षटकारांसह ५६ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि व्ंयकटेश अय्यर यांनी छोटी भागीदारी रचली. व्यंकटेशने २० तर अय्यरने २५ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या हर्षल पटेलने १८ धावांचे योगदान दिले. तर शेवटच्या षटकात दीपक चहरने १९ धावांची फटकेबाजी केली. दीपकने २१ धावांची खेळी केली. २० षटकात भारताने ७ बाद १८४ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सँटनरने सर्वाधिक २७ धावांत ३ बळी घेतले.

दोन्ही संघांत बदल

मालिकाविजय निश्चित झाल्यामुळे आज रोहितने संघात बदल केले. सलामीवीर केएल राहुल संघाबाहेर असून इशान किशनला संधी मिळाली. अश्विनला विश्रांती मिळाल्यामुळे फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलला आज आपली छाप पाडण्याची सुवर्णसंधी मिळाली. तर न्यूझीलंडने आपला कप्तानच बदलला. टिम साऊदी ऐवजी मिचेल सँटनरने नेतृत्व केले.

हेही वाचा – SEXTING Scandal : टिम पेनची साडेसाती सुरूच..! त्याच्या भावोजींवरही लागला घाणेरडा आरोप; ‘त्याच’ महिलेला…

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, यजुर्वेंद्र चहल.

न्यूझीलंड : मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट ( यष्टीरक्षक ), जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार) , अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs new zealand third t20 match report adn

Next Story
विजयी भव !