आज न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीवर नजर
पीटीआय, लखनऊ
पहिल्या सामन्यात फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताचे रविवारी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दमदार पुनरागमनाचे लक्ष्य असेल. तीन सामन्यांच्या मालिकेत ०-१ असे पिछाडीवर गेल्यामुळे भारताला या सामन्यात विजय अनिवार्य आहे.
रांची येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या फिरकीपटूंपुढे भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या अनुभवी फलंदाजांच्या अनुपस्थितीत इशान किशन, शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांसारख्या युवकांना संधी मिळाली आहे. मात्र, त्यांना या संधीचा फारसा उपयोग करता आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर धावांसाठी दडपण आहे. दीपक हुडामध्ये अखेरच्या षटकांत फटकेबाजीची क्षमता असली, तरी त्याला अजून अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नाही. त्याने गेल्या १३ डावांमध्ये केवळ १७.८८च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे या युवकांनी आपला खेळ उंचावून सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंडय़ा यांना साथ देणे गरजेचे आहे.
विशेषत: किशनवर सलामीचे स्थान टिकवण्यासाठी दडपण आहे. किशनने डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले होते. मात्र त्यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये किशन धावांसाठी झगडताना दिसतो आहे. त्याने जून २०२२ पासून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक केलेले नाही.पहिल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने अष्टपैलू योगदान दिले, तर गोलंदाजीत कुलदीप यादवने प्रभावी मारा केला. अर्शदीप सिंग, उमरान मलिक व शिवम मावी या वेगवान गोलंदाजांनी कामगिरी सुधारणे गरजेचे आहे.
त्रिपाठी कामगिरी उंचावणार?
कोहलीला विश्रांती आणि श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे महाराष्ट्राचा आक्रमक फलंदाज राहुल त्रिपाठीला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळते आहे. त्रिपाठीने ‘आयपीएल’च्या गेल्या काही पर्वात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला भारताच्या ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळाले, मात्र त्याला अजून छाप पाडता आलेली नाही. श्रीलंकेविरुद्ध अनुक्रमे ५ आणि ३५ धावा करून बाद झाल्यावर न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात त्रिपाठीला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडविरुद्ध उर्वरित दोन ट्वेन्टी-२० सामने त्रिपाठीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतील.
वेळ : सायं. ७ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदूी