India vs New zealand, T20 World Cup Final: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी २५३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण इंग्लंडचा संघ विजयापासून अवघ्या ७ धावा दूर राहिला. यासह इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. तर भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघ फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताच इतिहास घडणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत वनडे, कसोटी क्रिकेटच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. आता दोन्ही संघ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत भिडणार आहेत. २ संघ ३ वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये अंतिम सामना खेळणार असल्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. याआधी असं कधीच घडलेलं नाही. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. न्यूझीलंडने पहिल्यांदाच या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर भारताने चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला असून, भारतीय संघ गतविजेता संघ आहे.
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ स्पर्धेतील अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी केन विलियम्सन भारतीय संघाचा कर्णधार होता. तर भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीकडे होती.
कसोटीनंतर २०२५ मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतही भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुबईत पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदाचा मान मिळवला होता. त्यावेळी रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता. यावेळी भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे आहे. तर न्यूझीलंडच्या नेतृत्वाची जबाबदारी मिचेल सँटनरकडे आहे. न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावणार का? की भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
