भारत पाकिस्तान सामन्या म्हटल्यावर तो रोमहर्षक होईल ही अपेक्षा रविवारी फोल ठरली आणि कोट्यावधी भारतीयांची निराशा झाली. आधी फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. मात्र या पराभावानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती सामना पाहण्यासाठी उपस्थित असणारे बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी केलेल्या एका सेलिब्रेशनची.

भारतीय डावात काय घडलं
झालं असं की भारतीय संघाची फलंदाजी या सामन्यामध्ये ढेपाळल्याचं पहायला मिळालं. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. विराट कोहली आणि ऋषभ पंत वगळता कोणत्याही खेळाडूला या सामन्यात आपल्यचा फलंदाजीची जादू दाखवता आली नाही. भारताचा कर्णधार विराट कोहलीचे (५७) झुंजार अर्धशतक व्यर्थ ठरले. प्रथम फलंदाजी करताना भारताला २० षटकांत ७ बाद १५१ धावाच करता आल्या. रोहित शर्मा (०) आणि के. एल. राहुल (३) या सलामीच्या जोडीला शाहीनने स्वस्तात माघारी पाठवले. तसेच सूर्यकुमार यादवही (११) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर मात्र कोहली (५७) आणि ऋषभ पंत (३९) यांनी पडझड थांबवली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी ५३ धावांची भागीदारी रचल्यावर फिरकीपटू शादाब खानने ऋषभला बाद केले. कोहलीने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी केल्यावर त्याला शाहीननेच माघारी धाडले. कोहलीला साथ देण्यासाठी आलेले रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या यांनाही काही विशेष कामगिरी करता आली नाही.

ते सेलिब्रेशन कशासाठी?
सामन्याच्या शेवटच्या काही षटकांमध्ये भारतीय फलंदाज चांगली फटकेबाजी करतील अशी अपेक्षा असतानाच भारतीय संघातील फलंदाज मात्र संथ खेळत होते आणि थोडे सेट झाल्यावर तंबूत परतताना दिसले. चौकार षटकार दूरच पण एकेरी, दुहेरी धावा घेतानाही भारतीय फलंदाज चाचपडत होते. प्रकृतीसंदर्भात शंका उपस्थित केल्या जात असलेला हार्दिक पांड्या जडेजा बाद झाल्यावर मैदानात उतरला. मात्र त्यालाही योग्य पद्धतीने चेंडू टोलवता येत नव्हता. सामन्याच्या १९ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर सेट झालेला विराट तंबूत परतल्यानंतर भुवनेश्वर कुमार फलंदाजीसाठी आला. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पुढच्या षटकात स्ट्राइक मिळावी म्हणून पांड्याने एक चोरटी धाव घेतली. शाहीन शाह आफ्रिदीने पांड्याला धाव बाद करण्याच्या नादात ओव्हर थ्रोच्या चार अतिरिक्त धावा दिल्या. शाहीन आफ्रिदीने स्टॅम्पच्या दिशेने फेकलेला चेंडू पकडण्यासाठी मागे कोणीच नसल्याने चेंडू थेट बॅण्ड्री लाइनवर गेला.

एकीकडे भारताला धावा जमवताना अडचणी येत असतानाच दुसरीकडे मोफत मिळालेल्या या चार धावा पाहून स्टॅण्डमध्ये सामना पाहण्यासाठी आलेले जय शाह आणि अक्षय कुमार हे उठून हात उंचावून हे ओव्हर थ्रोचे रन सेलिब्रेट करु लागले. त्यांचा हा उत्साह कॅमेरामध्ये कैद झाला असून अनेकांनी केवळ चार धावांसाठी एवढं सेलिब्रेशन करणाऱ्या या सेलिब्रिटींना पाहून आश्चर्य व्यक्त केलंय.

पाकिस्तानी चाहत्यांची निराशा पाहून आनंद झाल्याचा दावा

अधिकच्या धावा दिल्या म्हणून

या दोघांना कोणीतरी बाहेर न्या

हे चेहरे सारं काही सांगून जातायत

जय शाह यांना यापूर्वी असं कधी पाहिलं नाही

दरम्यान, सामन्यामधील पहिल्या डावात भन्नाट गोलंदाजी केल्यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली.