scorecardresearch

Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ पाकिस्तानात होणार! भारताच्या सामन्याबाबत घेतला मोठा निर्णय, कुठला असेल वेन्यू?

आशिया चषक २०२३ हंगामासाठी मध्यम मार्ग शोधण्यात आला आहे. यावेळी ही स्पर्धा केवळ पाकिस्तानच्या यजमानपदी खेळवली जाणार आहे. मात्र भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जावे लागणार नाही. या स्पर्धेअंतर्गत टीम इंडिया आपले सामने दुसऱ्या देशात खेळणार आहे.

Asia Cup 2023: Asia Cup can be held in Pakistan only special plan for India's matches know the whole matter
सौजन्य- (ट्विटर)

Asia Cup 2023: आशिया चषक २०२३चे यजमानपद फक्त पाकिस्तानकडेच राहू शकते. या स्थितीत भारतीय संघाविरुद्धचे सामने तटस्थ मैदानावर खेळवले जाऊ शकतात. हे मैदान दुबईचे असण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोठ्या चर्चेनंतर बीसीसीआय आणि पीसीबीने नवीन योजनेसह ही स्पर्धा आयोजित करण्यास सहमती दर्शवली आहे. या योजनेनुसार पाकिस्तानला आशिया चषक देण्यात येणार असला तरी भारताविरुद्धचे सामने पाकिस्तानऐवजी तटस्थ देशात होणार आहेत.

भारताचे सामने कोणत्या मैदानावर होणार हे अद्याप ठरलेले नाही, मात्र यूएई, ओमान, श्रीलंका आणि इंग्लंड हे आशिया चषक स्पर्धेतील भारताचे पाच सामने खेळवण्याची शक्यता आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील किमान दोन सामन्यांचाही समावेश आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सहा देशांच्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. या दोघांशिवाय या गटात एक पात्रता संघ असेल. त्याचवेळी दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. आशिया चषक २०२३ मध्ये १३ दिवसांत एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत. २०२२ आशिया चषक स्पर्धेच्या स्वरूपानुसार, प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ सुपर ४ मध्ये जातील आणि अव्वल दोन संघ अंतिम फेरीत सामील होतील. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होऊ शकतात.

अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्पर्धेतील सर्व सहभागी देश आणि प्रसारकांसाठी वेळापत्रक आणि प्रवास योजना तयार करण्यासाठी थोडक्यात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पाकिस्तानबाहेरील दुसरे मैदान निश्चित करण्यात हवामान महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची शक्यता आहे. तसेच, आशियाई यजमानांमध्ये हाय-प्रोफाइल भारत-पाकिस्तान सामने आयोजित करण्यासाठी ओढ लागलेली आहे. युएई मधील तापमान साधारणतः सप्टेंबरच्या सुरुवातीला ४० अंश सेंटीग्रेडच्या आसपास असते, तरीही तेथे सामने आयोजित केले गेले आहेत. २०२१ची आयपीएल सप्टेंबरच्या अखेरीस तेथे खेळली गेली. ओमानची राजधानी मस्कत, कमी तापमानाचा आनंद घेते आणि २०२१च्या टी२० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीचे आयोजन केले होते. या सामन्यांचे यजमानपद इंग्लंडसाठी कठीण आहे. मात्र, लंडनसारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने या सामन्यांचे आयोजन करण्याची संधी इंग्लंडला दिली जाऊ शकते.

हेही वाचा: Rahul Dravid: अखेर राहुल द्रविडने अनुभवी फिरकीपटूसोबत काम करण्यास का दिला नकार? ट्विटरवर केला माजी खेळाडूने खुलासा

एसीसीच्या सदस्यांनी आशिया चषक पाकिस्तानबाहेर आयोजित करण्याबाबत अनेक बैठका घेतल्या आणि आता या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. या बैठकीचे अध्यक्ष नजम सेठी होते, तर बीसीसीआय संघाचे सचिव जय शाह आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांचा समावेश होता. भारत आणि पाकिस्तानमधील खराब राजकीय संबंधांमुळे बीसीसीआय आपले खेळाडू तिथे पाठवायला तयार नाही. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली होती. यानंतर पाकिस्तानने भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता आणि दोन्ही देशांतून यावर बरीच चर्चा झाली होती. आता या प्रकरणावर तोडगा निघताना दिसत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 14:01 IST

संबंधित बातम्या