India vs Pakistan Semi Final Scenario: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत- पाकिस्तान सामना होणार की नाही?अशी जोरदार चर्चा रंगली होती. अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डला आयसीसीसमोर झुकावं लागलं. १५ फेब्रुवारीला कोलंबोत भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली. आता दोन्ही संघ सुपर ८ फेरीतील सामने खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. दोन्ही संघांना सेमीफायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत- पकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळू शकतो. दोन्ही संघांसाठी कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

भारतीय संघासाठी सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण अगदी सोपं आहे. भारतीय संघाला जर सेमीफायनलमध्ये जायचं असेल,तर वेस्ट इंडिजला कुठल्याही परिस्थितीत पराभूत करावं लागणार आहे. तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण जरा कठिण आहे. पाकिस्तानचा सुपर ८ फेरीतील शेवटचा सामना श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. पाकिस्तानला धावांचा बचाव करताना हा सामना ६५ किंवा त्यांहून अधिक धावांनी जिंकावा लागणार आहे. तर धावांचा पाठलाग करताना १३ षटकात सामना जिंकावा लागणार आहे.

नॉकआऊट सामन्यांमध्ये भारत- पाकिस्तान संघ भिडणार?

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सेमीफायनलचा सामना पाहायला मिळू शकतो. जर पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या राहिला आणि भारतीय संघ आपल्या गटातून पहिल्या स्थानी गेला, तर दोन्ही संघांमध्ये सेमीफायनलचा सामना पाहायला मिळू शकतो. पण ही शक्यता खूप कमी आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानी विराजमान आहे. तर दुसरी शक्यता अशी की, दोन्ही संघांनी जर सेमीफायनलचा सामना जिंकून फायनलमध्ये प्रेवश केला तर, तर फायनलमध्ये भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळू शकतो.

पाकिस्तानचं समीकरण तळ्यात मळ्यात

पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. पाकिस्तानने सुपर ८ फेरीतील२ सामन्यांपैकी एक सामना गमावला आहे. तर एक सामना पावसामुळे गमावला होता. त्यामुळे पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. या गटातून इंग्लंडचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. तर न्यूझीलंडलाही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. तर श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.