India vs Pakistan Match In Asian Games 2026: क्रिकेटमध्ये भारत – पाकिस्तान सामना पाहण्यासाठी सर्वच क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. कारण हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात, तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. दोन्ही संघ कुठलीही द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आमने सामने येत नाहीत. त्यामुळे दोन्ही संघांचा सामना केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये, आशिया चषक स्पर्धेत आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येच होतो. येत्या काही दिवसात जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ सहभाग घेणार आहेत. पण दोन्ही संघ आमने सामने येण्याची शक्यता खूप कमी आहे.
या स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ पाकिस्तानचा सामना करताना दिसतील. पण हे सामने मेडल राऊंडसाठी असणार आहेत. जर दोन्ही संघ आमने सामने आले तर, हा सामना सुवर्ण पदकासाठी किंवा मग कांस्य पदकासाठी असेल. या स्पर्धेसाठी २ गट असणार आहेत. प्रत्येक गटात ३ संघ असणार आहेत. यापैकी टॉप २ संघ क्वार्टरफायनलमध्ये खेळणार आहे.
भारत – पाकिस्तान सामना केव्हा होणार?
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान जपानमध्ये खेळवली जाणार आहे. यादरम्यान क्रिकेटचे सामने १७ सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत. तर अंतिम सामना ३ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत आधी महिलांचे सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर पुरुषांचे सामने सुरु होतील. आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्या आहेत, त्या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ कमीत कमी २ वेळा तरी आमने सामने आले आहेत. पण यावेळी हे दोन्ही संघ क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलमध्ये आमने सामने येण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण पाकिस्तानचा संघ क्वार्टर फायनलमध्ये १ मध्ये आहे. तर भारताचा संघ क्वार्टर फायनल २ मध्ये खेळणार आहे. जर भारतीय संघाने सेमी फायनमध्ये प्रवेश केला, तर भारतीय संघ क्वार्टर फायनल ३ च्या विजेत्या संघासोबत खेळणार. तर पाकिस्तानचा संघ क्वार्टर फायनल ४ च्या विजेता संघासोबत खेळणार.
या वेळापत्रकावरुन हे स्पष्ट झालं आहे की, भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ एकतर सुवर्ण पदकासाठी किंवा मग कांस्य पदकासाठी आमने सामने येणार आहेत. जर दोन्ही संघांनी सेमी फायनल जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला, तर फायनलमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळू शकतो. पण जर दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचू शकले नाहीत, तर मग कांस्य पदकासाठी दोन्ही संघांमध्ये लढत पाहायला मिळू शकते.
