India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येत नाहीत. दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आणि आशिया चषक स्पर्धेत एकमेकांचा सामना करतात. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारत आणि पाकिस्तान संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. यावेळी दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धेत, आशिया चषक स्पर्धेत नव्हे, तर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स या स्पर्धेत भिडणार आहेत.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स २०२५ स्पर्धेला येत्या १८ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जगातील ६ संघ सहभाग घेणार आहेत. ज्यात इंडिया चॅम्पियन्स, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, इंग्लंड चॅम्पियन्स, वेस्ट इंडिज चॅम्पियन्स, दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स या संघाचा समावेश असणार आहे.
केव्हा आणि कुठे रंगणार सामने?
क्रिकेट चाहत्यांना आपल्या दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत, ते पुन्हा एकदा मैदानावर फटकेबाजी करताना दिसतील. या स्पर्धेची सुरुवात १८ जुलैपासून होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना २० जुलैला रंगणार आहे. हा सामना एजबस्टनच्या मैदानावर रंगणार आहे.
भारतीय संघाकडून सुरेश रैना, इरफान पठाण आणि युवराज सिंगसारखे दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहेत. तर पाकिस्तानकडून शाहिद आफ्रिदी मैदानात उतरणार आहे. यासह भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आणखी काही दिग्गज खेळाडू इंडिया चॅम्पियन्स संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहेत.
भारतीय संघाचे सामने कधी होणार?
२० जुलै, भारत विरुद्ध पाकिस्तान
२२ जुलै, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२६ जुलै, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२७ जुलै, भारत विरुद्ध इंग्लंड
२९ जुलै, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज