India vs Pakistan Match In ICC Under 19 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२७ स्पर्धेचा थरार सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेतील पहिला सामना ७ फेब्रुवारीला अमेरिकेविरूद्ध होणार आहे. पण क्रिकेट चाहत्यांकडून १५ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. कारण यादिवशी कोलंबोत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेल सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी मोहसिन नक्वी यांनी सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. याबाबत २ फेब्रुवारीला निर्णय घेतला जाणार आहे. या स्पर्धेआधी क्रिकेट चाहत्यांना आणखी एक भारत- पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेआधी झिम्बाब्वे आणि नामिबीयात आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतही भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय अंडर-१९ संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. साखळी फेरीतील सर्व ३ सामने जिंकून भारतीय संघाने सुपर-४ फेरीत प्रवेश केला. त्यानंतर सुपर-६ फेरीतील पहिल्या सामन्यातही भारताने झिम्बाब्वेवर एकतर्फी विजयाची नोंद केली. भारतीय संघाचा पुढील सामना पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. पाकिस्तानने देखील या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाकडे पाकिस्तानला नमवून सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

भारत- पाकिस्तान सामना केव्हा होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सुपर ६ फेरीतील सामना १ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना रविवारी होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. हा सामा झिम्बाब्वेतील क्वीन्स पार्क स्पोर्ट क्लब, बुलावायो येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक अर्ध्या तासाआधी म्हणजेच, १२:३० वाजता होणार आहे. ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ८ तास अॅक्शन पॅक सामना पाहायला मिळू शकतो.

भारतीय संघ अव्वल स्थानी

भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून सुपर ६ फेरीत प्रवेश केला आहे. सुपर ६ फेरीत भारतीय संघाचा पहिला सामना झिम्बाब्वेविरूद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे तर पाकिस्तानचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानने ३ सामन्यांमध्ये २ गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.