India vs Pakistan Match In Icc Under 19 World Cup 2026: क्रिकेट चाहत्यांना टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सुरू होण्याआधीच भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. झिम्बाब्वे आणि नामिबीयात आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून सुपर ६ फेरीतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव केला. तर सुपर ६ फेरीत भारतीय संघाचा पुढील सामना पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होईल? जाणून घ्या.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रविवारी १ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना बुलावायोतील क्विन्स पार्क स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं ८ तास चांगलंच मनोरंजन होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक अर्ध्या तासाआधी म्हणजेच १२:३० वाजता होणार आहे. जर कुठल्याही अडथळ्याशिवाय ५०-५० षटकांचा सामना झाला, तर हा सामना ९ वाजेपर्यंत सुरू राहू शकतो.

पाकिस्तानसाठी अतिशय महत्वाचा सामना

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला भारतीय संघ सध्या तुफान कामगिरी करत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानसाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. भारताने जर हा सामना जिंकला, तर सेमीफायनलमधील स्थान जवळजवळ निश्चित होणार आहे. पण जर पाकिस्तानने हा सामना गमावला, तर त्यांचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद होणार आहे. याआधी दोन्ही संघ आशिया चषक स्पर्धेत आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ पराभवाची परतफेड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यात १४ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.

झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने वेगवान अर्धशतक झळाकावलं होतं. पण त्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला होता. आतापर्यंत त्याने या स्पर्धेत ३ अर्धशतकं झळकावली आहेत. दरम्यान या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. गेल्या सामन्यात अभिज्ञान कुंडू आणि विहान मल्होत्राने देखील दमदार खेळी केली होती. या सामन्यातही दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार) वैभव सूर्यवंशी, एरॉन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडु (यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टिरक्षक), आर.एस. अंबरीश, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग,उधव मोहन, कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल, मोहम्मद ऐनाम.