India vs Afghanistan T20I Series: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका झाल्यानंतर, भारतीय संघ घरच्या मैदानावर अफगाणिस्तानचा सामना करणार आहे. पण अफगाणिस्तानचा संघ यजमान असून भारतीय संघाचा पाहुणचार करणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. ही मालिका भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणार आहे, पण फायदा पाकिस्तानचा होणार आहे. ते कसं? जाणून घ्या.
भारतात होणाऱ्या या टी-२० मालिकेचे ब्रॉडकास्टिंग राईट्स अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानच्या ट्रांसग्रुप कंपनीला विकले आहेत. या कंपनीचा संबंध पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेशी देखील आहे. अफगाणिस्तानचा संघ भारतात भारतीय संघाचा पाहुणचार करणार, अशी घोषणा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने १२ ऑगस्टला केली होती. त्यावेळी क्रिकेट बोर्डाने ब्रॉडकास्टिंग राईट्सचा देखील उल्लेख केला होता. त्यावेळी पाकिस्तानचा देखील उल्लेख करण्यात आला होता.
ट्रांसग्रुप कंपनीचं हेड क्वार्टर लाहोरमध्ये आहे. इथूनच या मालिकेचं प्रसारण जगभरात केलं जाईल. या मालिकेचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करण्यासाठी ट्रांसग्रुप कंपनीने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठी रक्कम दिली असावी. पण भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये थरारक सामने पाहायला मिळू शकतात. त्यामुळे ट्रांसग्रुप कंपनीला चांगलाच फायदा होणार आहे. भारतात ही मालिका तुम्ही फॅनकोडवर लाईव्ह पाहू शकतात. पण जर तुम्हाला टीव्हीवर ही मालिका लाईव्ह पाहायची असेल, तर तुम्ही सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता.
आतापर्यंत झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान टी-२० सामन्यांमध्ये थरारक सामने पाहायला मिळाले आहेत. येत्या काही दिवसात भारतीय संघ एशियन गेम्स स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत भारत- अफगाणिस्तान सामना पाहायला मिळू शकतो. त्याआधी ही मालिका दोन्ही संघांसाठी सराव मालिका असणार आहे. मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबरला, दुसरा सामना १५ सप्टेंबरला आणि तिसरा सामना १७ सप्टेंबरला खेळवा जाणार आहे. पण या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने केली आहे.
