बुलावायो : पाच वेळच्या विजेत्या भारतीय संघाची युवा (१९ वर्षांखालील) पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर सिक्स’ गटात आज, रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. या वेळी आशिया चषकातील पराभवाची परतफेड करण्याची भारताकडे संधी असेल.
भारतीय संघाला गेल्या वर्षी २१ डिसेंबरला दुबई येथे झालेल्या युवा आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून १९१ धावांनी हार पत्करावी लागली होती. त्यामुळे भारतीय संघ कामगिरी उंचावण्याचे ध्येय बाळगून मैदानावर उतरेल. या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरने भारतीय संघाला मार्गदर्शन केले आहे.
भारतीय संघाने यंदाच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. भारताने अमेरिका, बांगलादेश आणि न्यूझीलंड संघांना पराभूत केले आहे. ‘सुपर सिक्स’ फेरीत भारताने यजमान झिम्बाब्वेला नमवले होते. भारतीय संघ आपली लय राखण्याचा प्रयत्न करेल. भारताकडून यष्टिरक्षक-फलंदाज अभिज्ञान कुंडू (चार सामन्यांत १८३ धावा) आणि वैभव सूर्यवंशी (चार सामन्यांत १६६ धावा) यांनी कामगिरीत सातत्य राखले आहे. विहान मल्होत्राकडूनही (चार सामन्यांत १५१ धावा) भारताला अपेक्षा असतील. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध गेल्या सामन्यात नाबाद १०९ धावांची खेळी केली होती. गोलंदाजीत हेनिल पटेल (चार सामन्यांत १० बळी) प्रभावी ठरला आहे. कर्णधार आयुष म्हात्रे अधिक चांगल्या योगदानासाठी प्रयत्नशील असेल.
दुसरीकडे, पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध आपला पहिला साखळी सामना गमावला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी स्कॉटलंड आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यांत विजय मिळवले. पाकिस्तानने मग ‘सुपर सिक्स’ फेरीत न्यूझीलंडला नमवत भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आत्मविश्वास मिळवला आहे. १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १७२ धावांची खेळी करणारा समीर मिन्हास चांगल्या लयीत आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ७४ आणि न्यूझीलंडविरुद्ध ७६ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला रोखण्याचेच भारतासमोर आव्हान असेल.
* वेळ : दुपारी १ वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २, जिओहॉटस्टार ॲप.

