India vs Pakistan Weather Update: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत रविवारी होणाऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी पाकिस्तानने भारतासोबत खेळण्यास नकार दिला होता. पण आता हा सामना होणार आहे. पण पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी कोलंबोत जोरदार पाऊस पडला आहे.

हवामान खात्याने आधीच, रविवारी पूर्ण दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते नाराज होऊ शकतात. कारण दोन्ही संघ आमनेसामने येतात त्यावेळी दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. पण जर पावसाने हजेरी लावली, तर हा सामना रद्द होऊ शकतो. असं झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल.

सामन्याच्या आदल्या दिवशी कोलंबोत जोरदार पाऊस

रविवारी होणाऱ्या सामन्याआधी शनिवारी भारतीय खेळाडूंनी कसून सराव केला. यादरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद देखील झाली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी दुपारी २ ते ५ दरम्यान कसून सराव केला. त्यानंतर भारतीय खेळाडू संध्याकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान सराव करणार होते. पण सराव सुरू होण्याआधीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भारतीय खेळाडू मैदानात सराव करू शकले नाहीत. भारतीय खेळाडूंना इन्डोर नेट्समध्ये सराव करावा लागला.

भारत – पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ६:३० वाजता होईल. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. यासह या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. टी -२० वर्ल्डकपमध्ये भारत – पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघ ८ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ७ सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला केवळ १ सामना जिंकता आला आहे.