महिला आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने आपली घोडदौड कायम ठेवत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं. या दिमाखदार विजयानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांवर गुंडाळला
सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिचा निर्णय भलताच अंगलट आला. भारतीय फिरकीपटूंनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली. श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी ३ बळी घेत पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारतीय आक्रमणासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या ५५ धावांत गारद झाला.
विजयासाठी मिळालेले ५६ धावांचे सोपे आव्हान भारताने अवघ्या ८.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदळ्यात सहज पूर्ण केले. कर्णधार हरमनप्रीत कौर (१८) आणि दीप्ती शर्मा (१२) यांनी नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला.
इरफान पठाणची एक्स (ट्विटर) पोस्ट चर्चेत
भारताच्या या दणदणीत विजयानंतर इरफान पठाणने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पाकिस्तानची खोड काढत एक मिश्कील पोस्ट केली. त्याने लिहिले, “आज संडे आहे का?” (Aaj Sunday hai kya?).
इरफानच्या या एका वाक्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. यापूर्वी २०२५ च्या पुरुष आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ सलग तीन रविवारी आमनेसामने आले होते. त्यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केल्यावर इरफानने “रविवार कसा राहिला, शेजाऱ्यांनो?” अशी पोस्ट केली होती. आता महिला संघाच्या विजयानंतर त्याने पुन्हा एकदा याच संदर्भाचा वापर करत पाकिस्तान टीमला ट्रोल केले आहे.
“आम्ही ठरवलेले नियोजन मैदानात उतरवले” – हरमनप्रीत कौर
सामन्यानंतर बोलताना कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. “हा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. संपूर्ण संघाने ज्या पद्धतीने कामगिरी केली, त्याचा मला आनंद आहे. आम्ही मैदानावर आक्रमक खेळ खेळण्याबद्दल बोललो होतो आणि खेळाडूंनी ते करून दाखवले. गोलंदाजांनी खेळपट्टीचा अचूक अंदाज घेत रणनीतीनुसार गोलंदाजी केली,” असे हरमनप्रीत म्हणाली.
भारत उपांत्य फेरीत, पाकिस्तानवर टांगती तलवार
या विजयासह भारतीय संघाने गट फेरीत आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. थायलंड, हाँगकाँग आणि पाकिस्तान या तिन्ही संघांना पराभूत करत भारताने ६ गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश आता धोक्यात आला असून त्यांना पुढील फेरीत पोहोचण्यासाठी हाँगकाँगविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
