Shreyanka Patil Catch: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील ६ वा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना स्मृती मानधनाने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर धावांचा बचाव करताना दीप्ती शर्माच्या गोलंदाजीचा कहर पाहायला मिळाला. तिने या डावात अवघ्या १० धावा खर्च करुन ५ गडी बाद केले. यासह भारताने हा सामना ६४ धावांनी आपल्या नावावर केला. यादरम्यान श्रेयंका पाटीलने एक भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना भारताकडून १५ वे षटक टाकण्यासाठी श्री चरणी गोलंदाजीला आली. त्यावेळी पाकिस्तानकडून रमीन शमीम फलंदाजी करत होती. श्रेयंका पाटील बॅकवर्ड पॉईंटवर क्षेत्ररक्षण करत होती. श्रीचरणीने टाकलेल्या चेंडूवर शमीमने स्टेपआऊट होऊन कव्हरच्या वरुन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण तिचा प्रयत्न फसला. चेंडू हवा तसा बॅटवर आला नाही. त्यामुळे झेल बाद होण्याची संधी निर्माण झाली. त्यावेळी श्रेयंकाने डाईव्ह मारुन भन्नाट झेल घेतला. या झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यातील दोन्ही डावात भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले. शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून ९१ धावांची भागीदारी केली. यादरम्यान स्मृतीने ६८ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांअखेर ६ गडी बाद १७० धावा केल्या.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानला हवी तशी सुरुवात करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे पाकिस्तानचा डाव गडबडला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तिच्या दमदार गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांचा काही निभाव लागला नाही. भारताने हा सामना ६४ धावांनी आपल्या नावावर केला.