दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी; सर्वबाद २१४
बिनबाद ८०सह भारताचे दमदार प्रत्युत्तर

पहिल्या कसोटीत बलाढय़ दक्षिण आफ्रिकेला चीतपट केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला. अचूक सूर गवसलेल्या भारतीय संघाने बंगळुरू येथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी खणखणीत खेळाचे प्रदर्शन करताना मैफल गाजवली. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना सहाय्य करेल या भूमिकेतून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकजिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि असंख्य भुवया उंचावल्या. विराटचा विश्वास गोलंदाजांनी सार्थ ठरवला मात्र तो फिरकीपटूंनी. दुसऱ्या सत्रातच दक्षिण आफ्रिकेचा डाव २१४ धावांत गुंडाळत भारतीय संघाने बाजी मारली. उर्वरित दिवसात बिनबाद ८० अशी मजल मारत भारतीय संघाने कसोटीवर भक्कम पकड जमवली.
बंगळुरूत गेले काही दिवस होणाऱ्या सातत्यपूर्ण पावसामुळे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल असा होरा व्यक्त करत विराटने गोलंदाजीचा निर्णय घेतला. याचदृष्टीने फिरकीपटू अमित मिश्राऐवजी अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला संधी देण्यात आली, तर उमेश यादवऐवजी एका सामन्याची बंदीची शिक्षा पूर्ण केलेला इशांत शर्मा संघात परतला. डेल स्टेन, व्हरनॉन फिलँडर दुखापतग्रस्त झाल्याने मॉर्ने मॉर्केल आणि कायले अबॉट यांना दक्षिण आफ्रिकेने संधी दिली, तर फिरकीपटू सिमोन हार्मेरच्या जागी अष्टपैलू जेपी डय़ुमिनीचा संघात समावेश करण्यात आला.
डीन एल्गर आणि स्टॅनिआन व्हॅन झील यांनी संथ आणि सावध सुरुवात केली. आठव्या षटकातच विराटने चेंडू अश्विनकडे सोपवला आणि व्हॅन झीलला पायचीत करत अश्विनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. दोनच चेंडूनंतर पदलालित्यासह फटका खेळण्याचा फॅफ डू प्लेसिसचा प्रयत्न चेतेश्वर पुजाराच्या अफलातून झेलमुळे संपुष्टात आला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. एल्गर आणि कर्णधार हशिम अमला यांनी डाव सावरण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु या दौऱ्यात सपशेल अपयशी ठरलेला अमला वरुण आरोनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याला केवळ ७ धावा करता आल्या. अमला बाद होताच प्रेक्षकांनी शंभरावी कसोटी खेळणाऱ्या एबी डी’व्हिलियर्सच्या नावाचा जयघोष सुरू केला. एल्गर-एबी जोडीने उपाहारापर्यंत आणखी पडझड होणार नाही याची काळजी घेतली.
मात्र उपाहारानंतरच्या पहिल्याच षटकात रवींद्र जडेजाला स्वीप करण्याचा एल्गरचा प्रयत्न फसला आणि चेंडू यष्टींवर जाऊन आदळला. एल्गरने ३८ धावा केल्या. एबीने डय़ुमिनीला हाताशी घेत ४२ धावांची भागीदारी केली. डय़ुमिनी स्थिरावलाय असे वाटत असतानाच अश्विनने त्याला रहाणेच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याने १५ धावा केल्या. जडेजाने डेन व्हिलासला माघारी धाडले. एकीकडे सहकारी बाद होत असताना एबीने चौकार आणि एकेरी-दुहेरी धावांची सांगड घालत दक्षिण आफ्रिकेचा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारेल याची काळजी घेतली. शंभराव्या कसोटीत विक्रमी शतकाकडे कूच करताना डी’व्हिलियर्स बाद झाला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर वृद्धिमान साहाने अफलातून झेल टिपत डी’व्हिलियर्सची खेळी संपुष्टात आणली. जडेजानेच कागिसो रबाडाला भोपळाही फोडू दिला नाही. मॉर्केलने २२ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर अश्विनने त्याला तंबूत परतावले. अबॉट धावचीत होताच दक्षिण आफ्रिकेचा डाव २१४ धावांत आटोपला. जडेजाने ५० धावांत तर अश्विनने ७० धावांत ४ बळी घेतले.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडालेल्या खेळपट्टीवर मुरली विजय आणि शिखर धवन यांनी सहजपणे खेळ करत ८० धावांची मजल मारली. ८० पैकी ४८ धावा चौकारांच्या रूपात वसूल करत या जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विजय २८, तर धवन ४५ धावांवर खेळत आहे. भारतीय संघ अजूनही १३४ धावांनी पिछाडीवर आहे.
धावफलक
दक्षिण आफ्रिका : स्टॅनिअन व्हॅन झील पायचीत गो. अश्विन १०, डीन एल्गर त्रि. गो. जडेजा २८, फॅफ डू प्लेसिस झे. पुजारा गो. अश्विन ०, हशिम अमला त्रि.गो. आरोन ७, एबी डी’व्हिलियर्स झे. साहा, गो. जडेजा ८५, जेपी डय़ुमिनी झे. रहाणे गो. अश्विन १५, डेन व्हिलास झे. आणि गो. जडेजा १५, कायले अबॉट धावचीत १४, कागिसो रबाडा झे. पुजारा गो. जडेजा ०, मॉर्ने मॉर्केल झे. बिन्नी गो. अश्विन २२, इम्रान ताहीर नाबाद ०, अवांतर : (लेगबाइज २, नोबॉल ६) ८
एकूण : ५९ षटकांत सर्वबाद २१४
बादक्रम : १-१५, २-१५, ३-४५, ४-७८, ५-१२०, ६-१५९, ७-१७७, ८-१७७, ९-२१४, १०-२१४
गोलंदाजी : इशांत शर्मा १३-३-४०-०, स्टुअर्ट बिन्नी ३-२-१-०, रवीचंद्रन अश्विन १८-२-७०-४, वरुण आरोन ९-०-५१-१, रवींद्र जडेजा १६-२-५०-४
भारत : शिखर धवन खेळत आहे ४५, मुरली विजय खेळत आहे २८,
अवांतर : (बाइज ४, नोबॉल ३) ७
एकूण : २२ षटकांत बिनबाद ८०
गोलंदाजी : मॉर्ने मॉर्केल ७-१-२३-०, कागिसो रबाडा ५-१-१७-०, कायले अबॉट ६-१-१८-०, इम्रान ताहीर २-०-९-०, जेपी डय़ुमिनी २-०-९-०
photo Caption : फॅफ डू प्लेसिसला बाद केल्यानंतर विराट कोहली, आर. अश्विन आणि अजिंक्य रहाणे यांचा जल्लोष