scorecardresearch

IND vs SA 1st ODI : पहिल्या पेपरमध्ये राहुल नापास..! दक्षिण आफ्रिकानं ३१ धावांनी जिंकला सामना

वनडे मालिकेत यजमान संघाची १-० अशी आघाडी

India vs South Africa 1st ODI Live Updates
दक्षिण आफ्रिकानं जिंकली पहिली वनडे

पार्लच्या बोलंड पार्कवर खेळवल्या गेलेल्या पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकाने भारताला ३१ धावांनी मात दिली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाची कमान सांभाळणारा केएल राहुल या सामन्यात अचूक रणनीती आखण्यात अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बावुमाने रूसी व्हॅन डर डुसेनसह केलेल्या दोनशे धावांच्या भागीदारीमुळे भारताला २९७ धावांचे आव्हान मिळाले. बावुमा आणि डुसेन यांनी शतके ठोकली. प्रत्युत्तरात भारताचा संघ ५० षटकात ८ बाद २६५ धावांपर्यंतच पोहोचू शकला. विराट कोहली, शिखर धवन आणि शेवटी शार्दुल ठाकूरने अर्धशतके झळकावली, पण मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. रूसी व्हॅन डर डुसेनला सामनावीर पुरस्कार मिळाला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताचा डाव

कप्तान केएल राहुल आणि शिखर धवन यांनी भारतासाठी ४६ धावांची सलामी दिली. फिरकीपटू एडन मार्करामने राहुलला (१२) यष्टीपाठी झेलबाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. धवनने विराटला सोबत घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात भारताने आपले शतक फलकावर लावले. शतकाकडे कूच करणाऱ्या धवनला फिरकीपटू केशव महाराजने माघारी धाडले. धवनने १० चौकारांसह ७९ धावांची खेळी केली. २६ षटकात भारताने २ बाद १४० धावा केल्या. पंतनंतर ऋषभ पंत मैदानात आला. दुसऱ्या बाजूला असलेल्या विराटने आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक साजरे केले. अर्धशतकानंतर विराटला माघारी धाडण्यात फिरकीपटू तबरेझ शम्सीला यश आले. त्याने विराटला झेलबाद केले. विराटने ३ चौकारांसह ५१ धावा केल्या. विराटनंतर भारताचा डाव गडगडला. श्रेयस अय्यर (१७) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने त्याला बाद केले. तर ऋषभ पंत यष्टीचीत झाला. पदार्पणवीर व्यंकटेश अय्यरही (२) झेलबाद झाला. दोनशे धावांच्या आत भारताने ७ फलंदाज गमावले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने अप्रतिम फलंदाजी करत चाहत्यांचे मनोरंजन केले. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. शार्दुलने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५० धावा केल्या. ५० षटकात भारतीय संघ ८ बाद २६५ धावांपर्यंतच पोहोचू शकला. आफ्रिकेकडून एनगिडी, शम्सी आणि फेहलुकवायो यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेचा डाव

क्विंटन डी कॉक आणि जानेमन मलान यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. पण भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने मलानला मोठी खेळी करू दिली नाही. अवघ्या ६ धावांवर मलान तंबूत परतला. त्यानंतर कप्तान टेंबा बावुमाने डी कॉकसह संघाचे अर्धशतक फलकावर लावले. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने डी कॉकचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. डी कॉकने २७ धावा केल्या. त्यानंतर आलेला एडन मार्कराम कमनशिबी ठरला. पदार्पणवीर व्यंकटेश अय्यरने त्याला धावबाद केले. शंभरी गाठण्यापूर्वी आफ्रिकेने तीन फलंदाज गमावले. त्यानंतर बावुमा आणि रूसी व्हॅन डर डुसेन यांनी मोर्चा सांभाळला. या दोघांनी संघासाठी शतकी भागीदारी केली. दरम्यान बावुमा आणि डुसेन यांनी आपले अर्धशतकही फलकावर लावले. दबाव हटल्यानंतर दोघांनी भारतीय गोलंदाजांवर आक्रमणाला सुरुवात केली.बावुमाला डुसेनने सुंदर साथ दिली. ४५ षटकात या दोघांनी आफ्रिकेसाठी २४५ धावा पूर्ण केल्या. याच षटकात बावुमाने वनडे कारकिर्दीतील आपले दुसरे शतक साजरे केले. बावुमापाठोपाठ डुसेननेही आपले शतक पूर्ण केले. ४९व्या षटकात बुनराहने बावुमाला राहुलकरवी झेलबाद केले. बावुमाने ८ चौकारांसह ११० धावा केल्या. शेवटच्या षटकात डुसेनने केलेल्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेला तीनशे धावांच्या जवळ पोहोचता आले. ५० षटकात आफ्रिकेने ४ बाद २९६ धावा केल्या. डुसेनने ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १२९ धावा केल्या.

रबाडा बाहेर

आफ्रिकेचा घातक गोलंदाज कगिसो रबाडा भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भाग घेणार नाही. त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने विश्रांती दिली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA) एका निवेदनात म्हटले, “वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला भारताविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याने पूर्णपणे ताजेतवाने व्हावे, अशी आमची इच्छा आहे.”

हेही वाचा – ‘‘तू नेहमीच माझा कॅप्टन…”, विराटसाठी मोहम्मद सिराज झाला भावूक; पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत : केएल राहुल (कर्णधार) , शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, यजुर्वेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक ( यष्टीरक्षक), जानेमन मलान, एडन मार्कराम, रुसी व्हॅन डर डुसेन , टेंबा बावुमा (कर्णधार), डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को जानसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs south africa 1st odi live updates adn

ताज्या बातम्या