लखनऊ : शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे गुरुवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयी सलामीचे लक्ष्य आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताचे प्रमुख खेळाडू गुरुवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याने आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यांचा या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न असेल.

रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत धवन, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, दीपक चहर यांसारख्या खेळाडूंवर भारतीय संघाची भिस्त आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडू असणारे श्रेयस, चहर, रवी बिश्नोई यांचा आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरीचा मानस असेल. फलंदाजांमध्ये राहुल त्रिपाठी आणि रजत पाटीदार यांच्यापैकी एकाला पदार्पणाची संधी मिळू शकेल.

’ वेळ : दु. १.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी