scorecardresearch

भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताने एकदिवसीय मालिकाही गमावली ; दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेचा ७ गडी राखून विजय

लक्ष्याचा पाठलाग करताना डीकॉकने पहिल्या षटकापासूनच आक्रमणावर भर दिला.

पर्ल : कसोटीतील मानहानीनंतर किमान एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ आफ्रिकेत यश मिळवेल, अशी आशा बाळगणाऱ्या तमाम चाहत्यांचा शुक्रवारी हिरमोड झाला. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खचलेल्या भारतीय संघाला आफ्रिकेने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सात गडी आणि ११ चेंडू राखून सहज धूळ चारली.

भारताने दिलेले २८८ धावांचे लक्ष्य आफ्रिकेने ४८.१ षटकांत गाठून तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. त्यामुळे उभय संघांतील रविवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्याचे महत्त्व कमी झाले. क्विंटन डीकॉक (६६ चेंडूंत ७८ धावा) आणि जानेमन मलान (१०८ चेंडूंत ९१) ही सलामी जोडी आफ्रिकेच्या विजयाची शिल्पकार ठरली.

प्रथम फलंदाजी करताना डावखुरा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने (७१ चेंडूंत ८५) कारकीर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. त्याला राहुल (७९ चेंडूंत ५५) आणि शार्दूल ठाकूर (३८ चेंडूंत ४०) यांच्या बहुमूल्य योगदानाची साथ लाभल्यामुळे भारताने ५० षटकांत ६ बाद २८७ धावांपर्यंत मजल मारली.

माजी कर्णधार विराट कोहली कारकीर्दीत १४व्यांदा शून्यावर बाद झाला. तर श्रेयस अय्यर (११), वेंकटेश अय्यर (२२) पुन्हा छाप पाडण्यात अपयशी ठरले. परंतु पंतने कारकीर्दीतील चौथे, तर राहुलने १०वे अर्धशतक झळकावतानाच तिसऱ्या गडय़ासाठी ११५ धावांची भागीदारी रचून संघाला पावणेतीनशे धावांपलीकडे नेले. अखेरच्या षटकांत मुंबईकर शार्दूलने आणखी एकदा त्याचे अष्टपैलूत्व सिद्ध केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना डीकॉकने पहिल्या षटकापासूनच आक्रमणावर भर दिला. विशेषत: भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटूंवर त्याने सातत्याने हल्ला केला. त्यातच ३२ धावांवर पंतने त्याला यष्टीचीत करण्याची संधी गमावली. डीकॉक आणि मलान यांच्या जोडीने १३२ धावांची सलामी देत विजयाची पायाभरणी केली. ठाकूरने डीकॉकला पायचीत पकडले. तर भारताचा दिवसातील सर्वोत्तम गोलंदाज ठरलेल्या जसप्रीत बुमराने मलानचा अडसर दूर केला.

मात्र सलामीवीरांची मेहनत वाया जाऊ न देता टेम्बा बव्हुमा (३५), रासी व्हॅन डर डसन (नाबाद ३७), एडिन मार्करम (नाबाद ३७) यांनी संयमी फलंदाजी करून आफ्रिकेचा विजय सुनिश्चित केला. भारताच्या सलग दुसऱ्या पराभवामुळे राहुलचे नेतृत्वकौशल्य, मधल्या फळीची हाराकिरी, गोलंदाजीतील सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव यांसारखे मुद्दे चर्चेचा विषय ठरत आहेत.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ६ बाद २८७ (ऋषभ पंत ८५, के. एल. राहुल ५५; तबरेझ शम्सी २/५७) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : ४८.१ षटकांत ३ बाद २८८ (जानेमन मलान ९१, क्विंटन डीकॉक ७८; जसप्रीत बुमरा १/३७)

सामनावीर : क्विंटन डीकॉक

८५ ऋषभ पंतने (८५) भारतीय यष्टिरक्षक-फलंदाजांद्वारे आफ्रिकेविरुद्धची सर्वोत्तम खेळी साकारली. त्याने राहुल द्रविडच्या ७७ (दरबान, २००१) धावांच्या खेळीला पिछाडीवर टाकले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs south africa 2nd odi south africa beat india by 7 wickets in 2nd odi zws

ताज्या बातम्या