भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दिल्ली येथे पार पडलेल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा ७ गडी राखून धुव्वा उडवला आहे. आता दुसरा टी-२० सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेन. दुसरा सामना कटक येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी कटकमध्ये तिकीट विक्री सुरू असताना मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तिकीट घेण्यासाठी उभ्या असणाऱ्या रांगेत काही महिला रांगेच्या पुढे आल्या, त्यामुळे जमावाने गोंधळ घालायला सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला.

पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “तिकीट काढण्यासाठी उभ्या असलेल्या रांगेत काही महिला रांगेच्या पुढे आल्या, यावेळी तिकीट घेण्यासाठी आलेल्या काही नागरिकांनी आरडाओरड करत गोंधळ घालायला सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.”

१२ हजार तिकिटं आणि ४० हजार लोकांची गर्दी
अतिरिक्त जिल्हा पोलीस आयुक्त प्रमोद रथ यांनी सांगितलं की, “१२ हजार तिकीटांची विक्री सुरू असताना काउंटरवर सुमारे ४० हजार लोकांची गर्दी होती. तिकीट विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडता यावी, म्हणून पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला.”

हेही वाचा- IND vs SA T20 Series : ऋषभ पंतने ‘नको त्या’ गोष्टीत केली विराट कोहलीची बरोबरी

पहिल्या सामन्यात भारताचा पराभव
दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारताने आफ्रिकेला २१२ धावांचं मोठं लक्ष्य दिलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं ५ चेंडू बाकी असताना सहज विजय मिळवला. भारताला पहिल्यांदाच टी-२० सामन्यात २०० पेक्षा जास्त धावांचा बचाव करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड मिलरने आयपीएलचा उत्कृष्ट फॉर्म कायम राखत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला.