India vs South Africa : गहुंजेचा गड कोण जिंकणार?

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीला आजपासून प्रारंभ

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीला आजपासून प्रारंभ

भारत-द. आफ्रिका कसोटी मालिका

प्रशांत केणी, पुणे

सलामीवीर रोहित शर्माचा प्रयोग अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी ठरला आहे. आता त्याला फलंदाजीचा निखळ आनंद लुटू दे, अशी ग्वाही भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली. मग पुण्याच्या दुसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी परिपूर्ण असल्याचे व्यावसायिक उत्तर विराटने बुधवारच्या पत्रकार परिषदेत दिले. परंतु गहुंजेची खेळपट्टी ही विशाखापट्टणमपेक्षा अधिक प्रमाणात फिरकीला साथ देईल. त्यामुळे नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे आहे, याची पक्की जाणीव दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसला आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाश्र्वभूमीवरील ही उभय कर्णधारांची जुगलबंदी सामन्याचे चित्र मांडते आहे.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या कसोटीसह विजयी आघाडी घेण्याचा भारताचा निर्धार आहे. परंतु भारतातील खेळपट्टय़ांची मला जाण आहे. आम्ही जिद्दीने मालिकेत पुनरागमन करू, असा विश्वास डय़ू प्लेसिसने व्यक्त केला आहे. विशाखापट्टमणच्या पहिल्या कसोटीत भारताने २०३ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

२०१७ मध्ये गहुंजेला झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला तीन दिवसांत धूळ चारली होती. प्रतिस्पर्धी संघासाठी रचलेल्या फिरकीच्या जाळ्यात भारत स्वत:च सापडला. खेळपट्टीचे हेच हुकमी स्वरूप भारतासाठी धोकादायक ठरू शकते. याशिवाय पावसाचे सावट असल्याने कधी ढगाळ तर कधी प्रखर सूर्यप्रकाश हे वातावरण दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळेच सराव संपल्यानंतर विराट डोक्याला टॉवेल गुंडाळून ड्रेसिंग रूममध्ये परतला.

भारतीय सलामीवीर लक्ष्यस्थानी

विशाखापट्टणमच्या कसोटीतील दोन्ही डावांमध्ये शतके झळकावून रोहित शर्माने मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा फलंदाज हा शिक्का पुसून टाकला, तर दुसरा सलामीवीर मयांक अगरवालने द्विशतकी खेळीने क्रिकेटरसिकांची दाद मिळवली. कसोटीतील सलामीची जोडी मिळाल्यामुळे मायदेशात होणाऱ्या आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांसाठी भारताची प्रमुख समस्या मिटली आहे. आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे भारताच्या सलामीवीरांना जेरबंद करण्याचे प्राथमिक आव्हान असेल. रोहित कसोटी क्रिकेटमध्ये काय करतोय, याकडे लक्ष केंद्रित करू नका, असा सल्ला विराटने पत्रकारांना दिला आहे. विराट, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि हनुमान विहारी यांच्या भारताची फलंदाजी अधिक भक्कम झाली आहे. त्यामुळे गहुंजेच्या खेळपट्टीने फलंदाजांना साथ दिल्यास हे भारतीय फलंदाज पुन्हा बहारदार शतकांसह संघाला ५०० धावसंख्येचा डोंगर उभारून देऊ शकतील.

परदेशातील विजयासाठी दुप्पट गुण हवे -विराट

वेस्ट इंडिजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकत जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दृष्टीने भारताने १२० गुणांची कमाई केली होती. परंतु या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीनंतर परदेशातील विजयासाठी दुप्पट गुण देण्याची सूचना भारताचा कर्णधार विराट कोहलीने केली आहे. ‘‘जर तुम्ही मला जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी गुणदान पद्धती तयार करायला सांगितली तर मी परदेशातील विजयासाठी दुप्पट गुण देईन. पहिल्या आवृत्तीनंतर हे पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे,’’ असे विराट म्हणाला.

सामन्यावर पावसाचे सावट

पुण्याच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे पुणेकरांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळच्या उन्हामुळे भारतीय संघाला नेटमधील सराव करता आला. पण सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याने गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी आणि दुपारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. परंतु पाऊस थांबताच २० मिनिटांत मैदान खेळासाठी सज्ज करण्याची यंत्रणा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडे आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचे पावसामुळे नुकसान झाले होते.

वेगवान आणि फिरकी दोन्ही गोलंदाजांसाठी खेळपट्टी साथ देईल. पहिले दोन दिवस ती फलंदाजांसाठी पोषक ठरेल. परंतु खेळपट्टी काय रंग दाखवेल, हे सांगणे नेहमीच अवघड असते. सकाळी खेळपट्टी, हवामान पाहून अंतिम ११ खेळाडू निश्चित करू.

– विराट कोहली, भारताचा कर्णधार

फिरकीची रणनीती महत्त्वाची

भारताने विशाखापट्टणमचा गड रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन फिरकी गोलंदाज तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या बळावर जिंकला. आता दुसऱ्या कसोटीत फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत कोणती रणनीती आखतो, ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पहिल्या कसोटीप्रमाणे दक्षिण आफ्रिकेची मदार केशव महाराज, सेनूरॅन मुथूस्वामी आणि डेन पीट या तीन फिरकी गोलंदाजांवर असेल. परंतु वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीला संघात स्थान मिळाल्यास पीटला विश्रांती द्यावी लागेल.

कामगिरी उंचावण्याचे आफ्रिकेपुढे आव्हान

डीन एल्गर (१६०), क्विंटन डी कॉक (१११) आणि सेनूरॅन मुथूस्वामी यांच्यावर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची प्रमुख मदार असेल. पहिल्या कसोटीत भारताच्या ५०० धावसंख्येला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेकडून डी कॉक आणि एल्गर यांनी शतके झळकावत ४३१ धावा उभारल्या होत्या. आफ्रिका संघातील भारतीय वंशाचा अष्टपैलू खेळाडू मुथूस्वामीने दोन्ही डावांत झुंजार फलंदाजी करताना अनुक्रमे नाबाद ३३ आणि नाबाद ४९ धावा केल्या होत्या. पहिल्या कसोटीतील ही सकारात्मक कामगिरीच दुसऱ्या कसोटीत अधिक उंचावू शकेल, असा आशावाद डय़ू प्लेसिसने व्यक्त केला आहे.

संघ :

भारत :

विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल.

दक्षिण आफ्रिका :

फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बव्हुमा, थ्युनिस डी ब्रून, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडीन मार्करम, सेनूरॅन मुथूस्वामी, लुंगी एन्गिडी, एनरिच नॉर्जे, व्हर्नन फिलँडर, डेन पीट, कॅगिसो रबाडा, रुडी सेकंड.

फॅफ डय़ू प्लेसिसने आफ्रिकेचा कसोटी कर्णधार म्हणून १९९४ धावा केल्या असून, दोन हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला सहा धावांची आवश्यकता आहे.

आफ्रिकेच्या केशव महाराजला कसोटी कारकीर्दीतील बळींचे शतक साकारण्यासाठी एका बळीची आवश्यकता आहे.

* सामन्याची वेळ :सकाळी ९.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs south africa 2nd test match summary zws

ताज्या बातम्या