केपटाऊनमध्ये रंगलेला तिसरा आणि मालिकेतील शेवटचा वनडे सामनाही भारताने गमावला आहे. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी ६ धावांची गरज होती, पण आफ्रिकेने शेवटच्या फलंदाजाला बाद करत हा सामना ४ धावांनी जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिका ३-० अशी जिंकली. या सामन्यात भारताचा कप्तान केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकचे शतक आणि रूसी व्हॅन डर डुसेनच्या अर्धशतकाच्या जोरावर आफ्रिकेने भारताला २८८ धावांचे आव्हान दिले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली होती, पण या सामन्यातील शेवटच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे आफ्रिकेला तीनशेपार जाता आले नाही. प्रत्युत्तरात भारताकडून शिखर धवन, विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावली. संघाचा डाव गडगडला असताना तळाचा फलंदाज दीपक चहरनेही अर्धशतक ठोकले. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला आणि आफ्रिकेने हा सामना खिशात टाकला.

भारताचा डाव

cricket lover such a passion for sports that a man converted his building rooftop into a cricket ground people are liking the video
क्रिकेटचे वेड! पठ्ठ्याने थेट इमारतीच्या छतावरच उभं केलं भलंमोठं क्रिकेट ग्राउंड, पाहा Video
IRE vs AFD 1st Test Match Updates in Marathi
IRE vs AFG : आयर्लंडचा पहिलावहिला कसोटी विजय; अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात
Who is Srivats Goswami
Shreevats Goswami : क्रिकेट जगतात खळबळ! बंगालच्या माजी क्रिकेटपटूने केला मॅच फिक्सिंगचा आरोप, वाचा नेमकं प्रकरण?
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने केएल राहुलला स्वस्तात माघारी धाडत भारताला चांगली सुरुवात करू दिली नाही. राहुलनंतर शिखर धवनने विराट कोहलीसोबत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. धवनने आपला फॉर्म कायम राखत फलंदाजी केली. त्याने विराटसोबत अर्धशतकी भागीदारी करत १९व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. तत्पूर्वी धवनने आपले अर्धशतकही पूर्ण केले. अँडिले फेलुक्वायोने भारताला लागोपाठ दोन धक्के दिले. प्रथम त्याने धवनला नंतर पंतला बाद केले. धवनने ५ चौकार आणि एका षटकारासह ६१ धावा केल्या, तर पंत पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. दुसऱ्या बाजूला असलेल्या विराटने किल्ला लढवत आपले अर्धशतक पूर्ण केले. संघाला आधाराची गरज असताना विराट केशव महाराजचा बळी ठरला. विराटने ५ चौकारांसह ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. विराटनंतर श्रेयस अय्यरची साथ द्यायला सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्यकुमारने आक्रमक तर श्रेयसने सावध पवित्रा घेत फलंदाजी केली. दोनशे धावा पूर्ण करण्याआधी श्रेयस (२६) बाद झाला. त्यानंतर भारताला सहावा धक्का बसला. चांगल्या लयी दिसणारा सूर्यकुमार रचनात्मक फटका खेळण्याच्या नादात ड्वेन प्रिटोरियसचा बळी ठरला. सूर्यकुमारने ४ चौकार आणि एका षटकारासह ३९ धावा केल्या. भारताने जयंत यादवच्या रुपात आपला सातवा फलंदाज गमावला. सामना लवकर संपणार असे वाटत असताना दीपक चहरने आक्रमक फलंदाजी केली. त्याने भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. त्याने झटपट अर्धशतक ठोकले. भारताला विजयासाठी १० धावांची गरज असताना तो बाद झाला. चहरने ५ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा केल्या. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी ६ धावांची गरज होती आणि आफ्रिकेला एका विकेटची आवश्यकता होती. ड्वेन प्रिटोरियसने टाकलेल्या या षटकात चहल झेलबाद झाला आणि आफ्रिकेने ४ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघ २८३ धावांवर आटोपला. आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी आणि फेलुक्वायो यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

दक्षिण आफ्रिका संघाचा डाव

क्विंटन डी कॉक आणि जानेमन मलान यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. मागील सामन्यात दमदार अर्धशतक ठोकलेल्या मलानला या सामन्यात फार काही करता आले नाही. वेगवान गोलंदाज दीपक चहरने त्याला (१) यष्टीपाठी झेलबाद केले. तर त्यानंतर आलेला कप्तान टेंबा बावुमा (८) राहुलकडून धावबाद झाला. चोरटी धाव घेणे बावुमाला अंगउलट आले. ३४ धावांत आफ्रिकेने २ फलंदाज गमावले. चहरने एडन मार्करामला आपल्या जाळ्यात अडकवले. मार्कराम १५ धावांची भर घालून बाद झाला. एका बाजूने डी कॉक संघाची धावगती वाढवत होता. १८व्या षटकात डी कॉकने अर्धशतक पूर्ण केले. फॉर्मात असलेल्या रूसी व्हॅन डुर डुसेननेही डी कॉकला चांगली साथ देत फलंदाजी केली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. डी कॉकने आपले शतक पूर्ण केले. डुसेननेही आपले अर्धशतक फलकावर लावले. संघाला दोनशेपार पोहोचवल्यानंतर डी कॉक बाद झाला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला धवनकरवी झेलबाद केले. डी कॉकने १२ चौकार आणि २ षटकारांसह १२४ धावा केल्या. डी कॉकनंतर डुसेनही खेळपट्टीवर जास्त काळ टिकला नाही. फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने त्याला झेलबाद केले. श्रेयस अय्यरने डुसेनचा अप्रतिम झेल टिपला. डुसेनने ४ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांची खेळी केली. डुसेन-डी कॉकने १४४ धावांची भागीदारी रचली. २१८ धावांत आफ्रिकाने आपले ५ फलंदाज गमावले. त्यानंतरही आफ्रिकेचा डाव गडगडला, पण डेव्हिड मिलर आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी धावा जमवल्या. मिलरला ३९ तर प्रिटोरियसला २० धावा करता आल्या. ४९.५ षटकात आफ्रिकेचा संघ २८७ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने ३ तर, बुमराह आणि चहर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

दोन्ही संघात बदल

भारतीय संघाने आज चार बदल केले. रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यरला विश्रांती देण्यात आली आहे. तर सूर्यकुमार यादव, दीपक चहर, जयंत यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळाली आहे. तर आफ्रिकेने तबरेझ शम्सीऐवजी ड्वेन प्रिटोरियसला खेळवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – कर्णधारपद सोडण्याची विराटवर सक्ती; शोएब अख्तरचा आरोप

दोन्ही संघांची संभाव्य Playing 11

दक्षिण आफ्रिका – टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, जानेमन मलान, रुसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, अँडिले फेलुक्वायो, मार्को जानसेन, केशव महाराज, ड्वेन प्रिटोरियस, लुंगी एनगिडी.

भारत – केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, यजुर्वेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, दीपक चहर, जयंत यादव, प्रसिद्ध कृष्णा.