पर्ल : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासह एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला शुक्रवारी फलंदाजीत आमूलाग्र सुधारणा करावी लागणार आहे. याशिवाय केएल राहुलच्या नेतृत्वकौशल्याचाही कस लागणार आहे. ही मालिका जिंकल्यास राहुलला कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठीही दावेदारी करता येऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना ३१ धावांनी गमावला. विराट कोहलीचे कर्णधारपद असताना भेडसावणारी मधल्या फळीची समस्या पुन्हा बुधवारी समोर आली. दक्षिण आफ्रिकेने रणनीती आणि कौशल्य या दोन्ही प्रांतांमध्ये भारतावर सरशी साधली.

वेंकटेशऐवजी सूर्यकुमार?

यजुर्वेद्र चहल आणि शार्दूल ठाकूर या गोलंदाजांवर रासी व्हॅन डर डसन आणि तेम्बा बव्हुमा हल्ला करीत असताना वेंकटेशला सहावा गोलंदाज म्हणून किमान चार-पाच षटकेही गोलंदाजीही दिली नाही. त्यामुळे वेंकटेशचा उपयोग काय केला, हा प्रश्न ऐरणीवर होता. वेंकटेशला सहाव्या क्रमांकावरील विशेषज्ञ फलंदाज वापरायचे होते, तर सूर्यकुमार यादव हा अधिक उत्तम आणि अनुभवी पर्याय होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर शिखर धवन, कर्णधारपदाचे ओझे हलके झालेला विराट कोहली आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांनी अर्धशतके झळकावली. मात्र डावाच्या मध्यावर धवन-कोहली लागोपाठ बाद झाल्यानंतर भारताच्या मधल्या फळीने हाराकिरी पत्करली. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर आणि रविचंद्रन अश्विन धावांचा आलेख उंचावण्यात अपयशी ठरले. आखूड टप्प्याच्या चेंडूंवर श्रेयस झगडताना आढळला.

गोलंदाजीत सुधारणा आवश्यक

पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल महागडे ठरले. चहल-अश्विनलाही अपेक्षित यश मिळाले नाही. या दोघांनी २० षटकांत १०६ धावा मोजल्या. डसन आणि बव्हुमा यांनी अश्विन आणि चहलच्या गोलंदाजीवर आत्मविश्वासाने स्वीपचे फटके खेळायला सुरुवात केली. तेव्हा राहुलने त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. जसप्रीत बुमराने दोन बळी मिळवत सातत्य राखले. शार्दूलने अर्धशतक सामना जिंकणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर नोंदवले; पण त्याच्याकडून गोलंदाजीच्या यशाची अपेक्षा आहे.

फिरकीवर मदार

ऑफ-ब्रेक गोलंदाजी करणाऱ्या एडिन मार्करमला सुरुवातीला गोलंदाजीला आणण्याची आफ्रिकेची अनपेक्षित चाल यशस्वी ठरली. त्याने राहुलचा बळी मिळवला. मार्करम, तबरेझ शम्सी आणि केशव महाराज या आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी २६ षटकांत १२४ धावा दिल्या आणि चार फलंदाज बाद केले. हाच दोन्ही संघांमधील फरक ठरला. लुंगी एन्गिडी व अँडिले फेहलुकवायो या दोघांनीही टिच्चून मारा केला.

बव्हुमा-डसनवर भिस्त

बव्हुमा आणि डसन यांनी चौथ्या गडय़ासाठी २०४ धावांची भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना झगडायला लावले. त्यामुळे ३ बाद ६८ अशी खराब सुरुवात करणाऱ्या आफ्रिकेला ४ बाद २९६ अशी समाधानकारक धावसंख्या उभारता आली. कर्णधार बव्हुमाने संयमी शतक झळकावले, तर डसनने ९ चौकार आणि ४ षटकारांनिशी ९६ चेंडूंत नाबाद १२९ धावांची खेळी साकारत धावांची वेग वाढवला.

संघ

’  भारत : के. एल. राहुल (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, शार्दूल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यजुर्वेद्र चहल, जयंत यादव, नवदीप सैनी, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, प्रसिध कृष्णा.

’  दक्षिण आफ्रिका : तेम्बा बव्हुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, झुबेर हम्झा, जानेमल मलान, एडिन मार्करम, रासी व्हॅन डर डसन, डेव्हिड मिलर, केशव महाराज, मार्को जॅन्सन, सिसांडा मगाला, वेन पार्नेल, लुंगी एन्गिडी, जॉर्ज लिंडे, अँडीले फेहलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस, तबरेझ शम्सी, कायले व्हेरेने.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs south africa big challenge for india to bounce back against south africa zws
First published on: 21-01-2022 at 03:44 IST