वृत्तसंस्था, कोलकाता
भारत आणि दक्षिण आफ्रिका या तुल्यबळांतील दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेला आज, शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून या वेळी दोन्ही संघांतील दर्जेदार फिरकी आणि वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांचा कस लागणे अपेक्षित आहे.
गेल्याच महिन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध २-० असे निर्भेळ यश संपादन केले होते. मात्र, आता कसोटीतील जगज्जेत्या दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय संघाला कडवी झुंज मिळणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी भारताला न्यूझीलंडविरुद्ध ०-३ अशा मानहानीकारक पराभवाचा सामोरे जावे लागले होते. त्या वेळी एजाझ पटेल आणि मिचेल सँटनर हे डावखुरे फिरकीपटू, तसेच ऑफ-स्पिनर ग्लेन फिलिप्स यांचा सामना करताना भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. या तिघांनी मिळून ३६ गडी बाद करण्याची किमया साधली होती. दक्षिण आफ्रिकेच्या संघातही केशव महाराज व सेनुरन मुथुसामी असे दोन डावखुरे फिरकीपटू आणि सायमन हार्मरच्या रूपात ऑफ-स्पिन गोलंदाज आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरुद्ध भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात, यावर या मालिकेचा निकाल अवलंबून असू शकेल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांसाठी ओळखला जातो. मात्र, सध्याच्या घडीला त्यांच्याकडे तीन उत्कृष्ट फिरकी गोलंदाजही आहेत. दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच पाकिस्तानातील कसोटी मालिका १-१ अशी बरोबरी सोडवली होती. त्यात महाराज, मुथुसामी आणि हार्मर यांनी मिळून ३५ गडी बाद केले होते. याउलट पाकिस्तानच्या नोमान अली, साजिद खान आणि सलमान आघा या फिरकी गोलंदाजांना मिळून २१ बळीच मिळवता आले होते. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेचे फिरकी त्रिकुट दमदार कामगिरी सुरू ठेवताना भारतीय फलंदाजांसमोरही आव्हान उपस्थित करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील.
वेगवान गोलंदाजांनाही मदत
ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा केली जात आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुलीने सामन्यासाठीची खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला अनुकूल नसेल असे म्हटले आहे. या खेळपट्टीवर काही प्रमाणात गवत ठेवण्यात आले असून विशेषत: पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना मदत मिळणे अपेक्षित आहे. भारताकडे जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज, तर आफ्रिकेकडे कगिसो रबाडा आणि मार्को यान्सन असे अप्रतिम वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे तेसुद्धा या सामन्यात मोठा प्रभाव पाडू शकतील.
साई सुदर्शनवर लक्ष
सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल, तसेच मधल्या फळीत कर्णधार शुभमन गिल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी अलीकडच्या काळात चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या दोन कसोटी मालिकांत प्रशिक्षक गौतम गंभीरसह संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शनला संधी दिली आहे. मात्र, साईला अद्याप विश्वास सार्थ ठरवता आलेला नाही. त्याने पाच कसोटी सामन्यांच्या नऊ डावांत केवळ २७३ धावा केल्या आहेत. यात अवघ्या दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे आता त्याच्यावर दडपण वाढत आहे. अष्टपैलू जडेजाचे स्थान निश्चित आहे. अन्य फिरकीपटूंच्या स्थानांसाठी कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी कोणाला पसंती मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मधल्या फळीत युवकांवर भिस्त
दक्षिण आफ्रिकेसाठी रायन रिकल्टन आणि एडीन मार्करम सलामीवीराची भूमिका बजावतील. मधल्या फळीत दक्षिण आफ्रिकेची भिस्त युवा फलंदाजांवर असेल. ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि टोनी डी झोर्झी हे फलंदाज प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार आहे. यावेळी त्यांचा भारताच्या गुणवान फिरकीपटूंविरुद्ध कस लागू शकेल. कर्णधार टेम्बा बव्हुमाच्या पुनरागमनामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बळकटी मिळाली आहे. बव्हुमाने अलीकडेच दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाकडून खेळताना अर्धशतक साकारले होते. त्यामुळे आता त्याला बाद करणे भारतासाठी निर्णायक ठरू शकेल.
संघ
भारत : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, आकाश दीप.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बव्हुमा (कर्णधार), एडीन मार्करम, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स, काएल व्हेरेने (यष्टिरक्षक), डेवाल्ड ब्रेव्हिस, झुबेर हमझा, टोनी डी झोर्झी, कॉर्बिन बॉश, वियान मुल्डर, मार्को यान्सन, कगिसो रबाडा, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी, सायमन हार्मर.
६१ : कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर गेल्या १५ वर्षांत झालेल्या कसोटी सामन्यांत ६१ टक्के बळी (१५९ पैकी ९७) वेगवान गोलंदाजांनी मिळवले आहेत. त्यामुळे या कसोटीतही वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल.
वेळ : सकाळी ९.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.
