scorecardresearch

भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० मालिका : भारताला विजयी आघाडी ; दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेवर १६ धावांची मात; सूर्यकुमार, राहुलची अर्धशतके

मिलरने ४७ चेंडूत ८ चौकार, ७ षटकारांसह नाबाद १०६ धावा केल्या. मात्र, त्यांना आफ्रिकेला विजय मिळवून देता आला नाही.

भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० मालिका : भारताला विजयी आघाडी ; दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेवर १६ धावांची मात; सूर्यकुमार, राहुलची अर्धशतके
सूर्यकुमारने २२ चेंडूंत ६१ धावा करताना पाच चौकार आणि पाच षटकार लगावले.

गुवाहटी : सूर्यकुमार यादव (२२ चेंडूंत ६१ धावा) आणि केएल राहुलच्या (२८ चेंडूंत ५७) फटकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी मात केली. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.  

भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद २३७  धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकांत ३ बाद २२१ धावांवर मर्यादित राहिला. डेव्हिड मिलर (४७ चेंडूंत नाबाद १०६) आणि क्विंटन डीकॉक (४८ चेंडूंत नाबाद ६९) यांचे प्रयत्न अपयशी ठरले.

आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने दोन दणके दिले. अर्शदीपने तीन चेंडूंच्या अंतराने कर्णधार टेम्बा बाऊमा (०) आणि रायली रूसो (०) यांना बाद केले. त्यानंतर एडीन मार्करमची (१९ चेंडूंत ३३) आक्रमकता अक्षर पटेलने रोखली. दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ बाद ४७ अशा अडचणीत असताना एकत्र आलेल्या डीकॉक आणि मिलर यांनी १७४ धावांची अभेद्य भागीदारी केली. मिलरने ४७ चेंडूत ८ चौकार, ७ षटकारांसह नाबाद १०६ धावा केल्या. मात्र, त्यांना आफ्रिकेला विजय मिळवून देता आला नाही.

त्यापूर्वी, राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा (३७ चेंडूंत ४३) यांनी आक्रमक सलामी दिली. त्यानंतर सूर्यकुमारने २२ चेंडूंत ६१ धावा करताना पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. त्याने केवळ १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताकडून हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरले. तसेच सूर्यकुमार व विराट कोहली यांनी ४३ चेंडूंत १०२ धावांची भागीदारी केली. कोहलीने २८ चेंडूंत सात नाबाद ४९ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक भारत : २० षटकांत ३ बाद २३७ (सूर्यकुमार यादव ६१, केएल राहुल ५७, विराट कोहली नाबाद ४९; केशव महाराज २/२३) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ३ बाद २२१ (डेव्हिड मिलर नाबाद १०६, क्विंटन डी कॉक नाबाद ६९; अर्शदीप सिंग २/६२)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या