scorecardresearch

भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताचा पराभव ; मधल्या फळीच्या हाराकिरीमुळे पहिल्या लढतीत निराशा

या विजयासह आफ्रिकेने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

पर्ल : शिखर धवन (८४ चेंडूंत ७९ धावा), विराट कोहली (५१) आणि शार्दूल ठाकूर (नाबाद ५०) या तिघांनी अर्धशतके झळकावूनही बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ३१ धावांनी पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवली. मधल्या फळीतील फलंदाजांच्या हाराकिरीचा भारताला फटका बसला.

सामनावीर रासी व्हॅन डर दुसेन (९६ चेंडूंत नाबाद १२९ धावा) आणि कर्णधार तेम्बा बव्हुमा (१४३ चेंडूंत ११०) या शतकवीरांनी रचलेल्या द्विशतकीय भागीदारीच्या बळावर आफ्रिकेने ४ बाद २९६ अशी धावसंख्या उभारली. मात्र भारताला ५० षटकांत ८ बाद २६५ धावांत रोखण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले. या विजयासह आफ्रिकेने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. उभय संघांतील दुसरा सामना शुक्रवारी खेळवण्यात येईल.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने कर्णधार के. एल. राहुलला (१२) स्वस्तात गमावले. मात्र धवन-कोहली यांच्या अनुभवी जोडीने दुसऱ्या गडय़ासाठी ९२ धावांची भर घालून भारताला नियंत्रण मिळवून दिले. धवनने ३४वे, तर कोहलीने ६३वे अर्धशतक साकारले. केशव महाराजने धवनचा २६व्या षटकात त्रिफळा उडवला, तर २९व्या षटकात कोहली बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर (१७), ऋषभ पंत (१६) आणि व्यंकटेश अय्यर (७) हे तिघे अनुक्रमे ३४ ते ३६ षटकांच्या दरम्यान माघारी परतल्यामुळे भारताचा डाव १ बाद १३८ वरून ६ बाद १८८ असा घसरला. शार्दूलने कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावून जसप्रीत बुमरासह नवव्या गडय़ासाठी ५१ धावांची भर घातली. परंतु तोपर्यंत भारताचा पराभव पक्का झाला होता.

तत्पूर्वी, ३ बाद ६८ धावांवरून बव्हुमा आणि दुसेन यांनी दोघांनीही कारकीर्दीतील दुसरे शतक साकारताना दुसऱ्या गडय़ासाठी १८३ चेंडूंतच २०४ धावांची भागीदारी रचली. आफ्रिकेसाठी भारताविरुद्ध कोणत्याही गडय़ासाठी रचण्यात आलेली ही दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी ठरली. बुमराने ४९व्या षटकात बव्हुमाला बाद करून ही जोडी फोडली; परंतु कारकीर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवणाऱ्या दुसेनने अखेपर्यंत नाबाद राहून नऊ चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली आणि आफ्रिकेला ३०० धावांच्या जवळ नेले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ४ बाद २९६ (रासी व्हॅन दर डुसेन नाबाद १२९, तेम्बा बव्हुमा ११०; जसप्रीत बुमरा २/४८) विजयी वि. भारत : ५० षटकांत ८ बाद २६५ (शिखर धवन ७९, विराट कोहली ५१, शार्दूल ठाकूर नाबाद ५०; अँडीले फेहलुकवायो २/२६)

सामनावीर : रासी व्हॅन डर दुसेन

कर्णधार राहुलचा अनोखा पराक्रम

स्थानिक एकदिवसीय सामन्यांत (लिस्ट-ए) कधीच नेतृत्व न करता थेट भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद भूषवणारा राहुल हा तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी माजी यष्टिरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी आणि सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला होता. त्याशिवाय कारकीर्दीतील अवघ्या ३९व्या एकदिवसीय लढतीत राहुलला भारताचे नेतृत्व करण्याची संधी लाभली. ५०पेक्षा कमी एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असूनही भारताचे नेतृत्व करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. यापूर्वी १९८४ मध्ये मोहिंदूर अमरनाथ यांनी कारकीर्दीतील ३५व्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या कर्णधाराची भूमिका बजावली होती.

विराट कोहलीने (५,१०८) परदेशातील एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अग्रस्थान मिळवले. त्याने सचिन तेंडुलकरच्या ५,०६५ धावांच्या विक्रमाला मागे टाकले.

विराट कोहलीने (१,३३८) आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले. त्याने ५१ धावांच्या खेळीदरम्यान सौरव गांगुली (१,३१३) आणि राहुल द्रविड (१,३०९) यांच्यावर सरशी साधली. सचिन तेंडुलकर (२,००१) या यादीत अग्रस्थानी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs south africa south africa beat india by 31 runs in first odi zws

ताज्या बातम्या