India-w vs South Africa-w: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील १८ वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघ वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर पहिल्यादांच आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. क्रिकेट चाहत्यांना असाच काहीसा सामना पाहायला मिळाला. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ गडी बाद १५८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला. हा दक्षिण आफ्रिकेसाठी ऐतिहासिक विजय आहे.
दक्षिण आफ्रिकेने महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये आजवर १५० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. पण मॅरीझॅन कॅपच्या नाबाद ८१ धावांच्या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ५ चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला. सलामीला आलेली लॉरा वॉल्डवॉर्ट २० धावा करुन माघारी परतली. तर टॅझमिन ब्रिट्से ४० धावांचे योगदान दिले. अॅनेरी डर्कसेन शून्यावर माघारी परतली. नदीन डी क्लार्क अवघ्या ५ धावांवर माघारी परतली. एका बाजूने विकेट्स जात होते, पण मॅरीझॅन कॅपने एक बाजू धरुन ठेवली होती. शेवटी क्लोई ट्रायॉनने नाबाद १० धावांची खेळी केली आणि मॅरीझॅन कॅपच्या ८१ धावांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला.
ही एक चूक टीम इंडियाला महागात पडली
या सामन्यात भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेल सोडले. जे भारतीय संघाला चांगलेच महागात पडले. पण शेवटी मॅरीझॅन कॅपचा झेल घेतला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता. तर झाले असे की, भारतीय संघाकडून १७ वे षटक टाकण्यासाठी शफाली वर्मा गोलंदाजीला आली होती. या षटाकातील पहिल्याच चेंडूवर तिने टॅझमिन ब्रिट्सला झेलबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर याच षटकात मॅरीझॅन कॅपला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. पण राधा यादवने हाती आलेला सोपा झेल सोडला. मॅरीझॅन कॅप तेव्हा सेट होती. जर ती बाद झाली असती, तर सामना भारतीय संघाच्या बाजूने झुकला असता. शेवटी तिने नाबाद ८१ धावांची खेळी केली आणि दक्षिण आफ्रिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. सलामीला आलेल्या शफाली वर्माने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने २४ धावा केल्या. शेवटी दीप्ती शर्माने २९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ७ गडी बाद १५८ धावांपर्यंज मजल मारली.
