पीटीआय, गॉल : यजमान श्रीलंकेचा फलंदाज सोनल दिनुषाने (१००) जिगरबाज शतकी खेळी करत भारतीय गोलंदाजांसमोर अनपेक्षित अडथळा निर्माण केला. मात्र, त्यानंतरही मानव सुथारच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांनी पहिल्या कसोटीच्या तिसर्या दिवशी श्रीलंकेवर १७८ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवत सामन्यावर आपले वर्चस्व कायम राखले.
भारताच्या पहिल्या डावातील ४६२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर आटोपला. भारताकडून डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने ७६ धावांत चार आणि रवींद्र जडेजाने ५७ धावांत तीन बळी घेत श्रीलंकेला सामन्यात एक पाऊल मागे राहण्यास भाग पाडले. पावसामुळे तिसर्या दिवसाचा खेळ लवकर थांबवावा लागला. त्यामुळे भारताला १३ षटकांची फलंदाजी करता आली नाही. आता कसोटी सामना निकाली काढण्यासाठी भारताकडे संभाव्य १९६ षटके शिल्लक आहेत.
तिसर्या दिवशी भारताने ९ बाद ४६० धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली आणि अवघ्या दोन धावा जोडून भारताचा पहिला डाव ४६२ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने डावाच्या आपल्या दुसर्याच चेंडूवर निशान फर्नांडोला (०) बाद करून श्रीलंकेला पहिला धक्का दिला. यानंतरसुथारने आपल्या पहिल्याच चेंडूवर दिनेश चंडीमलला (४) बाद केले. उपाहारापर्यंत सुथारच्या फिरकीच्या जोरावर भारताने श्रीलंकेची अवस्था ५ बाद ९९ अशी केली होती. लाहिरू उदारा (२७) आणि कमिंदू मेंडिस (१४) यांनी काही काळ प्रतिकार केला, पण सुथार आणि कुलदीप यादवने त्यांना फार काळ टिकू दिले नाही.
दिनुषा-डिकवेलाची झुंजार भागीदारी
उपाहारानंतर श्रीलंकेच्या डावाला सोनल दिनुषा आणि अनुभवी निरोशन डिकवेला यांनी सावरले. या जोडीने सहाव्या गड्यासाठी २१६ चेंडूत १४६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.अष्टपैलू रवींद्र जडेजा : रवींद्र जडेजा याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तीन गडी बाद करताना कारकीर्दीत ३५० बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला. या पाचमध्ये केवळ कपिल देव एकटा वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर चार हजार धावा आणि ३५० बळी अशी दुहेरी कामगिरी करताना तो क्रिकेट विश्वातील चौथा आणि भारताचा दुसराच अष्टपैलू खेळाडू ठरला. भारताकडून अशी कामगिरी केवळ कपिल देव यांच्या नावावर आहे.
संक्षिप्त धावफलक
’भारत (पहिला डाव) : ११६.४ षटकांत सर्वबाद ४६२
’श्रीलंका (पहिला डाव) : ७९.४ षटकांत सर्वबाद २८४ (सोनल दिनुषा १००, निरोशान डिकवेला ८०, लाहिरु उदारा २७, मानव सुथार ४/७६, रवींद्र जडेजा ३/५७)
